यंदाच्या मॉन्सूनला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी पर्यटनस्थळे गर्दींनी फुलले आहेत. परंतु, अनेकदा उत्साहाच्या भरात अनेकांचा जीव जातो. पाण्याचा प्रवाह अचानक वाढणे, धबधब्यातील पाणी अचानक वाढणे, नदीला पूर येणे अशा अनेक कारणांमुळे बेसावध असताना अनेकांना जलसमाधी मिळते. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थिती अत्यंत शांत आणि धीराने काही कृती केल्यास तुम्ही तुमच्यासह इतरांचा जीव वाचवू शकता. या साठी चीनने काही लोकांना प्रशिक्षण दिलं आहे. या प्रशिक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हवामान तज्ज्ञ एच. के. होसाळीकर यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

वर्षाविहासाठी लोणावळ्यात गेलेले पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी आहे. अन्सारी हे कुटुंब भुशी धरणाच्या वर असलेल्या जंगलात वॉटर फॉल (बॅक वॉटर) येथे वर्षाविहाराचा आनंद घेत होते. तेव्हा, पाच जण या वॉटर फॉलमधून भुशी धरणात वाहून गेल्याचे लोणावळा पोलिसांनी माहिती दिली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. भुशी धरण देखील ओव्हरफ्लो झालं असून पर्यटकांची गर्दी होत आहे. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे कुटुंब मधोमध एकमेकांना धरून उभं होतं. परंतु, पाण्याचा प्रवाह वाढला अन् संपूर्ण कुटुंब या पाण्यात वाहून गेलं.

असे अनेक अपघात दरवर्षी पावसाळ्यात घडतात. फक्त पर्यटनस्थळीच नव्हे तर गावातून वाहणारे ओढे-नाले असोत किंवा मोठ्या नद्यांमध्येही अचानक पाणी वाढतं आणि अपघात घडतात. त्यामुळे अचानक पाणी प्रवाह वाढल्यानंतर स्वतःसह इतरांचा जीव कसा वाचवावा याचं प्रात्यक्षित दाखवलं आहे.

हेही वाचा >> VIDEO : लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले! महिला आणि दोन मुलींचा मृतदेह मिळाला, दोन चिमुकल्यांचा शोध सुरू

कसा वाचवाल जीव?

साधारण अशी परिस्थिती ओढावली की आपण भीतीने एकमेकांना खेटून बाजूला उभे राहतो. एकमेकांना आधार देत साखळी घट्ट करतो. परंतु, तरीही या मानवी साखळी भेदून पाणी आपल्याला खोलवर वाहून घेऊन जातं. त्यामुळे अशा परिस्थिती आपण एकमेकांच्या बाजूला मानवी साखळी करून उभं राहण्यापेक्षा एकमेकांच्या मागे रांगेत उभं राहणं हिताचं आहे. पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने येतोय त्या दिशेला तोंड करून एका सक्षम माणसाला पुढे ठेवायचं. त्याच्या मागे एकामागोमाग दोन्ही हातांनी खाद्यांना पकडून सर्वांनी उभं राहायचं. यामुळे कितीही पाण्याचा झोत आपल्या दिशेने आला तरी आपल्यासह इतरांचे प्राण वाचू शकतात असा दावा या व्हिडिओतून केला आहे.

नैसर्गिक आपत्ती केव्हाही घडून येतात. यावेळी कोणाचंच चित्त थाऱ्यावर राहत नाही. तत्काळ जी कल्पना डोक्यात येते त्याचा वापर करून आपण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. परंतु, अनेकदा हे प्रयत्न अपयशी ठरतात अन् अनेकांचा बळी जातो. त्यामुळे अत्यंत शांतपणे, धीराने अन् संयमाने अशा परिस्थितीला तोंड द्यायचं असतं.