एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भातल्या उद्धव ठाकरेंनी दिलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल हे ठाकरेंच्या बाजूने लढत आहेत. या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा मांडला. तसंच माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीला संमती कशी दिली? असा प्रश्नही कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे आले नाहीत याचाच अर्थ घोडेबाजार झाला असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
पहाटेच्या शपथविधीबाबत काय म्हटलं आहे कपिल सिब्बल यांनी?
भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी होते त्यावेळी त्यांनी बहुमत आहे की नाही? हे न पाहताच त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना कसं काय निमंत्रण दिलं ? असा प्रश्न विचारत कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पहाटेचा शपथविधी सध्या चर्चेत आहे. हाच मुद्दा कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडला. एवढंच नाही तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हेतू माहित असल्यानेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडलं असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रश्न उपस्थित होण्याधीच दिलंय प्रश्नाचं उत्तर
दुसरीकडे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भूमिकेवर कोर्टात प्रश्न उपस्थित होण्याआधीच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी विविध प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. अजित पवार हे माझ्याकडे आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन आले होते. त्यांनी मला हे खात्रीशीर रित्या सांगितलं होतं की आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शपथ घेण्याची संमती दिली. राज्यपालपदी असताना तुमच्याकडे असलेल्या आमदारांची परेड करा हे सांगण्याचा अधिकार मला नाही त्यामुळे मला त्यांनी जे पत्र दाखवलं ते पाहून मी त्यांना शपथ दिली होती. त्यानंतर ते बहुमताची संख्या गाठू शकले नाहीत. त्यामुळे ते सरकार ७२ तासांमध्ये पडलं असं कोश्यारींनी म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी शिंदे गटावर जोरदार आरोप केले आहेत. तसंच राज्यपालांच्या भूमिकेवर त्यांनी साशंकता उपस्थित केली.