Child Marriages Rise In Pakistan: हवामान बदलाचा फटका पर्यावरणाला आणि पर्यायाने मनुष्याला बसत असल्याचे अनेक उदाहरणे जगभरात पाहायला मिळाली आहेत. पण पाकिस्तानला मात्र हवामान बदलांचा वेगळाच फटका बसला आहे. पाकिस्तानमध्ये २०२२ साली अभूतपूर्व अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर शेती संकटात आली. शेती संकटात आल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. मानवी हक्क कार्यकर्ते सांगतात की, हवामान बदलामुळे अर्थकारण बदलल्यामुळे बालविवाहाचे प्रमाण बरेच वाढले आहे.
एएफपी वृत्तसंस्थेने नुकतेच दोन बहिणींच्या लग्नाबाबत बातमी दिली. यात १४ वर्षांची शमीला आणि १३ वषांची अमीना यांचे लग्न पैशांसाठी लावण्यात आले. या मुलींच्या पालकांनीच सासरच्या लोकांकडून दुप्पट वयाच्या व्यक्तीशी लहान मुलींचे लग्न लावून दिले. कारण काय? तर या पैशांतून मुलींचे कुटुंबीय गुजराण करू शकतील.
एएफपीशी बोलताना शमीला म्हणाली, “माझं लग्न ठरलंय हे ऐकून मला आनंद वाटला. आता माझे आयुष्य सोपे होईल, असं माल वाटतंय.” आपल्या वयापेक्षा दुप्पट वय असलेल्या व्यक्तीशी लग्न करूनही गरीबीमुळे शमीलाला हे आयुष्य स्वीकारावं लागत आहे. शमीला पुढे म्हणाली की, प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे आमच्याकडे आता काहीच उरलेलं नाही. त्यामुळे लग्न झालं नसतं तर आम्ही इथेच खितपत पडलो असतो, असे वाटत आहे.
पाकिस्तानमध्ये जुलै आणि सप्टेंबर दरम्यान टोकाचे हवामान बदल दिसू लागले आहेत. त्यामुळे या काळात लाखो शेतकऱ्यांचा जीवनमान आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यांनुसार, या काळात पाकिस्तानमध्ये भूस्खलन, पूर परिस्थिती निर्माण होत आहे. तसेच पिकांचे दीर्घकालीन नुकसान होण्याचाही धोका वाढला आहे.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील अनेक गावे २०२२ नंतर अद्याप पूरातून सावरलेली नाहीत. या भागाला पूराचा सर्वाधिक फटका बसला होता. लाखो लोक विस्थापित झाले आणि पिकं उध्वस्त झाली. सुजग संसार या एनजीओजचे संस्थापक माशूक बिरहमानी सांगतात की, या सर्व परिस्थितीमुळे आता पाकिस्तानात ‘मान्सून ब्राइड’ (पावसाळी नवरी) असा ट्रेंड सुरू झाला आहे. माशूक यांची एनजीओ बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे.
हे ही वाचा >> ‘या’ देशात ९ वर्षांच्या मुलीशी लग्न करण्यास परवानगी? प्रस्तावित कायदा काय आहे? बालविवाहास कोणकोणत्या देशात मान्यता?
माशूक यांनी सांगितले की, कुटुंबाला जगण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे ते आपल्या मुलींना लग्नाच्या माध्यमातून एकप्रकारे विकतच आहेत. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर कुटुंबातील इतर सदस्यांची गुजराण होते. २०२२ च्या पुरात दाडू नावाच्या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले होते. अनेक महिने येथील तलाव सुकले नव्हते. या भागात बालविवाहाचे सर्वाधिक प्रमाण असल्याचेही ते म्हणाले.
एएफपीशी बोलताना शमीला आणि अमीनाच्या पालकांनी सांगितले की, आपल्या मुलींना गरिबीपासून वाचविण्यासाठी त्यांनी मुलींचे लग्न लावून दिले. शमीलाच्या सासूने सांगितले की, या लग्नाच्या बदल्यात शमीलाच्या पालकांना दोन लाख पाकिस्तानी रुपये (७२० डॉलर) देण्यात आले आहेत. या भागातील कुटुंबांना एक दिवसाला एक डॉलरचा खर्च येतो.