Pahalgam Terror Attack Updates Today : जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जिल्ह्यातील पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत. त्यांना तत्काळ महाराष्ट्रात आणण्याकरता सरकारकडून सर्वतोपरी मदत सुरू असून त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज ते माध्यमांशी बोलत होते.

“डोंबिवलीतील तीन मृतदेहांचे पार्थिव आज मुंबई विमानतळावर येणार असून दोन पार्थिव पुण्यात येणार आहेत. मुंबईत आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा एअरपोर्टवर व्यवस्था पाहत आहेत. तर, पुण्यात खासदार मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ कोऑर्डिनेशन पाहत आहेत”, अशी महिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, “पर्यटकांशी समन्वय साधल असून ज्यांनी संपर्क साधलाय त्यांची व्यवस्था केली आहे. काहींना इंडिगो विमानातून आणत आहोत. तसंच, उर्वरित पर्यटकाना आणण्याकरता इंडिगोला अतिरिक्त विमान पाठवण्याची विनंती करण्यात येणार आहे. त्याकरता आवश्यक तिकिटांची व्यवस्था खासदार मोहोळ बघत आहेत. आपले पर्यटक सुरक्षित आहेत. ही घटना घडल्यामुळे घाबरल्याने त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे.”

पाच लाखांची नुकसान भरपाई मिळणार

“मंत्रालयातही आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आलं आहे. माहितीची देवाण-घेवाण करण्याची व्यवस्था तिथे करण्यात आली. जम्मूचं प्रशासनही योग्य सहकार्य करतंय. व्यवस्था करत आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. तसंच, या हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची नुकसान भरपाई राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे”, असंही फडणवीसांनी जाहीर केलं.