नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. ९ जून रोजी सायंकाळी हा भव्य सोहळा पार पडणार आहे. सत्तास्थापन होण्याआधीच देशात आता मंत्रिमंडळाची चर्चा सुरू झाली आहे. मंत्रीमंडळात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. एनडीएअंतर्गत ही सत्ता स्थापन होणार असल्याने सर्व मित्रपक्षांना नाराज न करता मंत्रिपदे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून शिंदे गट आणि अजित पवार गटाला किती जागा मिळतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. एनडीए खासदारांची दिल्लीची बैठक संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या चर्चेवरही उत्तर दिलं आहे.
“उर्वरित काही कामं पुढच्या पाच वर्षांत होतील. मोदींनी भाषणात सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, महिला आणि युवा या सर्वांच्या जीवनात बदल घडला पाहिजे आणि सरकार म्हणून आपलं दायित्व आहे असं म्हटलंय. तसंच सरकार म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि खूप मोठे निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं. सर्व अर्थाने न्याय देणारं सरकार काम करेल, अशा शुभेच्छा मी त्यांना दिल्या आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा >> नव्या सरकारच्या मंत्रिमंडाळाचा फॉर्म्युला ठरला? महाराष्ट्रातील किती खासदारांची कॅबिनेटमध्ये वर्णी?
पत्रकारांनी मंत्रिमंडळात जागावटप केव्हा होणार असं विचारल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे, ते आमचं प्राधान्य आहे. अजून कोणतीही चर्चा नाही. मोदींनीही भाषणात सांगतिलं आहे. शिवेसना आणि भाजपा यांची वैचारिक युती आहे. देशाच्या विकासासाठी ही युती झाली आहे. कोणाला काय मिळेल या पेक्षा जनतेला काय मिळेल, हा देश पुढे कसा जाईल, यासाठी ही युती तयार झाली आहे. महाराष्ट्राला विकासासाठी खूप अपेक्षा आहेत. आणि मोदीजी नक्की महाराष्ट्राच्या विकासासाठी भरभरून योगदान देतील”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळावर थेट भाष्य करणं टाळलं आहे.
हेही वाचा >> Lok Sabha Election Result 2024 Live Updates: नरेंद्र मोदींचा टोला, “विरोधक ईव्हीएमची प्रेतयात्रा काढतील…”
महाराष्ट्रात किती जागांची चर्चा
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रातील महत्त्वाचे सहकारी म्हणूनही पाहिले जात आहे. त्यांचा पक्ष शिवसेनेने लोकसभेच्या ७ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने एनडीए सरकारमध्ये १ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री पदाची मागणी केल्याचं वृत्त आहे. तर, अजित पवार गटालाही एक जागा मिळणार असल्याची चर्चा आहे, असे वृत्त एबीपी न्यूजने दिले होते.