संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच मोठ्या संख्येने खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. कथितरित्या आक्षेपार्ह वर्तन केल्याचा ठपका ठेवून मंगळवारी लोकसभेतून आणखी ४९ खासदारांचे निलंबन केल्यामुळे दोन्ही सभागृहातील एकूण निलंबित खासदारांची संख्या १४१ वर पोहोचली आहे. मंगळवारी निलंबित केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, मनिष तिवारी आणि कार्ती चिदंबरम अशा नेत्यांचा सहभाग आहे.
मागच्या आठवड्यापासून खासदारांचे निलंबन करण्याचे चक्र सुरू झाल्यानंतर आता लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधकांची संख्या कमालीने घटली आहे. दोन्ही सभागृहात विरोधकांचे किती खासदार उरले आहेत. त्यावर टाकलेली ही नजर.
हे वाचा >> सर्वाधिक विरोधी खासदार निलंबित: हे का घडले, संसदेचे नियम काय सांगतात?
लोकसभेत किती खासदार उरले?
लोकसभेतील एकूण खासदारांची संख्या ५४३ एवढी आहे. त्यापैकी विविध कारणांमुळे २१ जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे सध्या लोकसभेचे एकूण संख्याबळ ५२२ एवढे आहे. भाजपा आणि सहकारी पक्षांचे मिळून ३२३ खासदार सभागृहात आहेत. तर विरोधी पक्षांचे १४२ खासदार आहेत. मागच्या आठवड्यात पहिल्यांदा १३ त्यानंतर या आठवड्यात सोमवारी ३३ आणि मंगळवारी ४९ खासदारांना निलंबित करण्यात आले. यामुळे लोकसभेतील निलंबित खासदारांची संख्या ९५ एवढी झाली आहे.
लोकसभेत आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी विरोधकांमधील जवळपास दोन तृतीयांश खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे सभागृहात आता केवळ ४७ खासदार उरले आहेत.
राज्यसभेत किती खासदार उरले?
राज्यसभेचे एकूण संख्याबळ २५० इतके आहे. मात्र काही जागा रिकाम्या असल्यामुळे सध्या राज्यसभेत २३८ खासदार आहेत. त्यापैकी ९३ खासदार एकट्या भाजपाचे आहेत. निलंबनाच्या कारवाईत विरोधकांच्या ४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. उर्वरित हिवाळी अधिवेशनासाठी या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या राज्यसभेत विरोधकांचे १०० हून कमी खासदार उरले आहेत. राज्यसभेतून विरोधी पक्षांच्या खासदारांचे निलंबन झाल्यानंतर संसदेच्या आवारात खासदारांनी निषेध आंदोलन केले.
आणखी वाचा >> “…हे सगळं खेदजनक आहे”, शरद पवारांचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र; खासदार निलंबनाचा उल्लेख करत म्हणाले…
मंगळवारी राज्यसभेतून एकाही खासदाराचे निलंबन झाले नाही. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांची नक्कल केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. कल्याण बॅनर्जी मिमिक्री करत असताना राहुल गांधी चित्रीकरण करत होते, त्यामुळे त्यांच्यावरही टीका होत आहे.