Dr. Manmohan Singh Dies at 92: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यानंतर जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. २००४ ते २०१४ असे तब्बल एक दशक डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पद भूषविले. पदावर असताना विरोधकांनी अनेकदा त्यांच्यावर जहरी टीका केली. मात्र या टीकेमुळे विचलित न होता डॉ. मनमोहन सिंग काम करत राहिले. हे करताना त्यांनी अनेकदा माध्यमांच्या तिखट प्रश्नांचाही सामना केला. ३ जानेवारी २०१४ रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून शेवटची पत्रकार परिषद घेतली होती. एकूण दशकभरात त्यांनी किती वेळा पत्रकार परिषदा घेतल्या. यावर एक नजर टाकू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत १०० हून अधिक पत्रकार उपस्थित होते. ६२ हून अधिक प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. यावेळी त्यांनी माध्यमांवरही बोट ठेवले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “मी कमकुवत पंतप्रधान आहे, असे मी बिलकुल मानत नाही. समकालीन माध्यमे आणि संसदेतील विरोधी पक्षांपेक्षा इतिहास माझ्याबद्दल अधिक दयाळू असेल.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर असताना आजवर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आणि सिंग यांच्या कार्यकाळाची अनेकदा तुलना केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पत्रकार परिषद न घेण्याच्या निर्णयावर अनेकदा टीका केली आहे. यासाठी ते डॉ. मनमोहन सिंग यांच्या धाडसी वृत्तीचा दाखला देत असत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एकेकाळी पक्षाचे माध्यम प्रमुख असलेल्या मनीष तिवारी यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या एकूण पत्रकार परिषदांचा आकडा जाहीर केला होता. तसेच त्यांनी किती दौरे केले, याचीही माहिती त्यांनी दिली.

हे वाचा >> ‘समकालीन माध्यमांपेक्षा इतिहास माझ्याबद्दल अधिक दयाळू असेल’, शेवटच्या पत्रकार परिषदेत मनमोहन सिंग काय म्हणाले होते?

मनीष तिवारी यांनी लिहिले, “पंतप्रधान असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी एकूण ११७ पत्रकार परिषदा घेतल्या. ७२ विदेश दौरे, १० वार्षिक परिषदा, २३ वेळा राज्यांचे दौरे आणि १२ वेळा निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले होते.” विशेष म्हणजे ३ जानेवारी २०२४ रोजीच मनीष तिवारी यांनी ही माहिती दिली. या तारखेलाच मनमोहन सिंग यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेला एक दशक पूर्ण झाले होते.

हे ही वाचा >> Dr. Manmohan Singh Death LIVE Updates : डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली

पत्रकार परिषदेबाबत बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते की, मी माध्यमांना घाबरणारा पंतप्रधान नाही. मी नियमितपणे पत्रकार परिषदा घेत होते. विदेश दौऱ्यावर जाताना आणि आल्यावर मी माध्यमांशी बोलत होतो.

एक्सवर एश्वर्या चौधरी नामक एका युजरने डॉ. मनमोहन सिंग यांच्या या विधानाचा एक मिम स्वरुपातील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो दिसत असून त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नसल्याचे याद्वारे प्रतित केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many press conference taken by dr manmohan singh as prime minister why is compare with pm modi kvg