Internet Shutdown Report In India : जगभरात २०२४ या वर्षांत सर्वाधिकवेळा इंटरनेट सेवा म्यानमारमध्ये बंद करण्यात आली होती, तर म्यानमारनंतर भारतात सर्वाधिकवेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. २०२४ या वर्षांत पहिल्या स्थानावर म्यानमार देश राहिला आहे, तर दुसऱ्या स्थानावर भारत देश राहिला. २०२४ या वर्षांत प्रामुख्याने जातीय हिंसाचार आणि निषेधांमुळे भारतात ८४ वेळा तर म्यानमारमध्ये ८५ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आलं होती. अशी माहिती आता ॲक्सेस नाऊच्या एका अहवालातून समोर आली आहे.
जगातील सर्वाधिकवेळा इंटरनेट बंद करणारा देश म्हणून भारताचं नाव न घेण्याची गेल्या सहा वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. २०२३ मध्ये ३९ देशांनी तब्बल २८३ वेळा इंटरनेट सेवा बंद केली होती. तसेच २०२४ मध्ये ५४ देशांनी तब्बल २९६ वेळा इंटरनेट सेवा बंद केली होती. आता भारताने २०२४ या संपूर्ण वर्षांत ८४ वेळा इंटरनेट सेवा बंद केली. त्यामुळे २०१८ नंतर प्रथमच भारताचं नाव या यादीत दुसऱ्या स्थानी घेण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दरम्यान, २०२३ मध्ये भारताने ११६ वेळा इंटरनेट सेवा बंद केली होती. त्या तुलनेत २०२४ या वर्षांत काहीसी घट होऊन भारताने २०२४ मध्ये ८४ इंटरनेट सेवा बंद केल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. या अहवालानुसार ८४ पैकी ४१ वेळा इंटरनेट बंद करण्याचं कारण आंदोलनांशी संबंधित होतं, तर त्यापैकी २३ वेळा जातीय हिंसाचार भडकल्याचं कारण होतं. तसेच गेल्या वर्षी सरकारी नोकरी प्लेसमेंट परीक्षेदरम्यान अधिकाऱ्यांनी पाचवेळा इंटरनेट बंद केलं होतं.
तसेच २०२४ या संपूर्ण वर्षांत १६ पेक्षा जास्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये किमान एकदा इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. राज्यनिहाय आकडेवारी पाहिली तर मणिपूरमधील राज्य सरकारने देशात सर्वाधिकवेळा (२१) इंटरनेट सेवा बंद केली होती. त्यानंतर हरियाणा (१२) आणि जम्मू आणि काश्मीर (१२) ही राज्य राहिली आहेत. दरम्यान, दूरसंचार कायदा २०२३ आणि दूरसंचार निलंबन नियम २०२४ मध्ये सुरक्षिततेच्या कमतरतेकडे लक्ष वेधून घेत २०२५ हे वर्ष भारतातील सर्व लोकांसाठी इंटरनेट सेवा शटडाउन-मुक्त वर्ष बनवण्याचं आवाहन करण्यात आलं असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
जगभरात किती वेळा इंटरनेट बंद करण्यात आलं?
गेल्या वर्षी ५४ देशांमध्ये २९६ हून अधिक सरकारने इंटरनेट सेवा बंद केली होती. आशिया पॅसिफिकमधील ११ देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये अशा २०२ व्यत्ययांची नोंद झाली. तसेच २०२४ मध्ये नोंदवलेल्या सर्व इंटरनेट सेवा बंदपैकी म्यानमार, भारत आणि पाकिस्तानचा वाटा ६४ टक्क्यांहून अधिक होता असंही या अहवालात म्हटलं आहे.