How much US Spent to Deport Indian Migrants: अमेरिकेतील अवैधपणे प्रवेश करणाऱ्या भारतीय स्थलांतरितांना नुकतेच अमेरिकेने भारतात पुन्हा आणून सोडले. सी-१७ या अमेरिकेच्या लष्करी विमानातून १०४ भारतीय नागरिकांना बुधवारी अमृतसरच्या श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोडण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर स्थलांतरितांच्या बाबतीत त्यांनी कडक पावले उचलणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार त्यांनी कारवाई सुरू केली आहे.
बुधवारी भारतात परतलेल्या १०४ नागरिकांमध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुलांचा समावेश होता. तसेच यामध्ये पंजाबचे ३०, हरियाणा व गुजरातचे प्रत्येकी ३३, तसेच महाराष्ट्र व उत्तर प्रदेशचे प्रत्येकी तीन आणि चंडीगडचे दोन नागरिक होते. भारतात परतल्यानंतर या स्थलांतरितांनी त्यांच्यावर आलेल्या कठीण प्रसंगाचे कथन केले. लाखो रुपये खर्च करून चोर मार्गाने जीवघेण्या डंकी रुटवरून त्यांनी अमेरिकेत प्रवेश केला होता. मात्र काही दिवसांतच त्यांच्या हातात बेड्या आणि पायात साखळ्या बांधून त्यांना पुन्हा भारतात पाठविण्यात आले.
स्थलांतरितांना पाठविण्यासाठी अमेरिकेने किती खर्च केला?
एएफपीच्या बातमीनुसार, अमेरिकन हवाई दलाच्या सी-१७ ए ग्लोबमास्टर थर्डचा वापर करून स्थलांतरितांना परत पाठविण्यासाठी अमेरिकेचा १० लाख डॉलर्स (८.७४ कोटी रुपये) पेक्षा जास्त खर्च झाला आहे. यावरूनच नागरी वाहतुकीपेक्षा लष्करी प्रवासाचा खर्च अधिक असल्याचे दिसते. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांना मायदेशी पाठविण्यासाठी जाणीवपूर्वक लष्करी विमानांचा वापर केल्याचे सांगितले जाते. यावरून ते स्थलांतरितांबद्दल कडक पावले उचलत असल्याचे प्रतीत होते.
एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) हे स्थलांतरितांना परत धाडण्यासाठी व्यावसायिक चार्टड विमानावर अवलंबून होते. २०२१ मधील आकडेवारीनुसार, चार्टड फ्लाइटसाठी प्रति तास ८,५७७ डॉलर इतका खर्च येत होता. सी – १७ ए ग्लोबमास्टर थर्ड हे विमान लष्करी कारवायादरम्यान अवजड सामान वाहून नेणे किंवा लष्करी कुमक पोहोचवण्यासाठी वापरले जात होते. या विमानाच्या उड्डाणाचा ताशी खर्च २८,५६२ डॉलर्स (२४.९८ लाख) इतका प्रचंड आहे. यावरूनच अमेरिकेने हाती घेतलेली मोहीम किती महाग आहे, हे कळून येते.
लष्करी विमान सी-१७ मुळे प्रत्येक स्थलांतरिताच्या मागे अमेरिकेला १० हजार डॉलर्स (८.७४ लाख) खर्च करावे लागत आहेत. याची तुलना व्यावसायिक विमानांच्या तिकिटांचा खर्च प्रत्येकी ५०० (४३,७३४ रुपये) ते ४००० (३.५ लाख रुपये) डॉलर्सच्या आसपास जातो. विमानातील क्लासप्रमाणे त्यात तफावत असू शकते.