Prashant Kishor On Bihar Bypolls 2024 : राजकीय पक्षांना निवडणूक जिंकवून देण्यासाठी सल्ला देणारे आणि यशस्वी निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांना ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन करत राजकारणामध्ये एन्ट्री केली आहे. ‘जनसुराज पार्टी’ नावाच्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना त्यांनी केली आहे. मात्र, आता स्वत: प्रशांत किशोर यांनी एक मोठा खुलासा केला केला आहे. राजकीय पक्षांना निवडणूक जिंकवण्यासाठी राजकीय सल्ला देण्यासाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर हे किती रुपये फी घेत असतील? याबाबत अनेकदा तर्कवितर्क लावले जातात. यासंदर्भात अनेकदा वेगवेगळ्या चर्चाही होतात. मात्र, यासंदर्भात आता खुद्द प्रशांत किशोर यांनी माहिती सांगत एका निवडणुकीत सल्ला देण्याची त्यांची फी उघड केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिहारमधील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान ३१ ऑक्टोबर रोजी प्रशांत किशोर यांना राजकीय रणनीतीकार म्हणून आपल्याला राजकीय पक्षांकडून किती फी मिळते? यासंदर्भातील माहिती त्यांनी शेअर केली आहे. प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे की, ‘कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला निवडणुकीचा सल्ला देण्यासाठी १०० कोटींहून अधिक फी आकारली जाते’, असं त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : “माझ्या वडिलांचं इथेच निधन झालं, त्यामुळे या घराचा…”, राहुल गांधींनी १०, जनपथबाबत केलं विधान!

प्रशांत किशोर यांनी बेलागंज येथील एका कार्यक्रमात मुस्लिम समुदायाच्या सदस्यांना संबोधित करताना सांगितलं की, ‘लोक अनेकदा त्यांना विचारतात की, ते त्यांच्या प्रचारासाठी पैसा कोठून आणतात? पण दहा राज्यांचे सरकार माझ्या रणनीतीमुळे स्थापन झाले आहे. मग माझ्या प्रचारासाठी तंबू आणि छत लावण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत असे तुम्हाला वाटते का? मी इतका कमकुवत आहे असं तुम्हाला वाटतं का? बिहारमध्ये माझ्यासारखे शुल्क कोणी आकारले नसेल. मी फक्त एका निवडणुकीत कोणाला सल्ला दिला तर माझी फी १०० कोटी रुपये किंवा त्याहूनही अधिक असते. पुढील दोन वर्षांसाठी मी अशाच एका निवडणुकीच्या सल्ल्याने माझ्या प्रचारासाठी निधी देणे सुरू ठेवू शकतो”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बिहारमधील चार विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीसाठी ‘जनसुराज पार्टी’ने उमेदवार उभे केले आहेत. मोहम्मद अमजद हे बेलागंजमधून पक्षाचे उमेदवार आहेत, जितेंद्र पासवान इमामगंजमधून तर सुशील कुमार सिंग कुशवाह हे रामगढमधून आणि किरण सिंग तरारीमधून उमेदवार आहेत. १३ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. तसेच २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे बेलागंज, इमामगंज, रामगढ आणि तरारी या चार जागांचा पोटनिवडणुकीकडे बिहारच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much does political strategist prashant kishor charge he made a big revelation himself in bihar bypolls 2024 softnews gkt