सध्या जगभर चर्चा चालू आहे ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची. ५ एप्रिलपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेले नवे टॅरिफ दर लागू झाले आणि जगभरात खळबळ उडाली. अनेक देशांनी अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध केला तर काही देशांनी यासंदर्भात ट्रम्प प्रशासनाशी बोलणी सुरू केली. याचा सर्वाधिक फटका चीनला बसला असून चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल १२५ टक्के समन्यायी व्यापार कर अर्थात Reciprocal Tariff लागू केलं आहे. iPhone बनवणाऱ्या Apple कंपनीसाठी हा निर्णय चिंता आणि खर्च वाढवणारा ठरला आहे.

चीन.. आयफोन उत्पादनाचं केंद्र

अॅपल कंपनीकडून चीनमध्ये सर्वाधिक आयफोनची निर्मिती केली जाते. इथूनच इतर देशांमध्ये आयफोन मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जातात. अमेरिकेतही मोठ्या संख्येनं आयफोनची निर्यात होते. पण ट्रम्प यांनी लागू केलेल्या नव्या व्यापार करांमुळे आयफोनच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतात तयार होणारे आयफोन इथून अमेरिकेत पाठवून तात्पुरती अमेरिकेतून येणारी आयफोनची मागणी पूर्ण करण्याचा मार्ग अॅपलनं निवडला आहे. मात्र, दीर्घकाळ हे धोरण अंगीकारणं अशक्य असल्यामुळे अॅपलसाठी ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण हा यक्षप्रश्न ठरण्याची शक्यता आहे.

आयफोनचा उत्पादन खर्च आणि निर्यात खर्च!

दरम्यान, अमेरिका व चीनमधील या टॅरिफ वॉरचा फटका आयफोन उत्पादक कंपनीसोबतच आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही बसण्याची शक्यता आहे. यासाठी आयफोन तयार करण्यासाठी येणारा खर्च व त्यात अतिरिक्त टॅरिफमुळे भर पडणारा खर्च यामुळे आयफोनच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. मनीकंट्रोलनं वॉल स्ट्रीट जर्नलमधील वृत्ताच्या हवाल्याने आयफोन उत्पादन खर्चाचं गणित मांडलं असून त्यानुसार आयफोन महाग होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

iPhone 16 Pro – उत्पादन खर्च किती?

सामान्य परिस्थितीत Apple ला चीनमधील उत्पादन केंद्रावर २५६ जीबीचा एक iPhone 16 Pro बनवण्यासाठी ५८० अमेरिकन डॉलर्स अर्थात भारतीय चलनात साधारणपणे ५० हजार रुपये खर्च येतो. या फोनमध्ये A18 Pro Chip (९०.८५ डॉलर), रेअर कॅमेरा सिस्टीम (१२६.९६ डॉलर), डिसप्ले (३७.९७ डॉलर) आणि याव्यतिरिक्त फोनच्या इतर भागांसाठी येणारा खर्च समाविष्ट आहे. अॅपलकडून हा फोन अमेरिकेत १०९९ डॉलर्सला विकला जातो. यात मार्केटिंग, रिसर्च, पॅकेजिंग व वाहतुकीच्या खर्चाचाही समावेश आहे.

फोनसाठीचे भाग चीनमध्ये होतात आयात

दरम्यान, अॅपल आयफोनसाठी लागणारे भाग हे चीनमध्ये इतर देशांमधून आयात करते. पण असं असलं, तरी या सगळ्या भागांना जोडून आयफोन तयार मात्र चीनमध्ये केला जातो. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले टॅरिफ दर हे निवडक गोष्टींसाठी नसून उत्पादनाच्या एकूण किमतीवर लागू असतील. यामुळेच आयफोनची किंमत अधिक वाढू शकते.

ट्रम्प यांच्या टॅरिफ दरांमुळे आयफोनचा उत्पादन खर्च ५८० डॉलर्सवरून (५०,००० रुपये) थेट ८४७ डॉलर्स अर्थात ७३ हजार ३७९ रुपयांपर्यंत वाढू शकतो. शिवाय हा उत्पादन खर्च चीनवर ५४ टक्के टॅरिफ लागू असेल तर इतका येईल. जितक्या प्रमाणात टॅरिफ वाढेल, तितक्या प्रमाणात हा उत्पादन खर्चदेखील वाढू शकतो.

ग्राहकांसाठी किती असेल किंमत?

उत्पादन खर्च अव्वाच्या सव्वा वाढत असल्यामुळे अॅपलसाठी निव्वळ नफा कमी होईल. कंपनीकडून हा वाढीव उत्पादन खर्चाचा भार स्वत:वर घेण्याची शक्यता कमी असून तो पूर्णपणे किंवा त्यातील काही भाग हा ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो. तसं झाल्यास अमेरिकेत आयफोनच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात.

अमेरिकेतच iPhone चं उत्पादन का नाही?

डोनाल्ड ट्रम्प यांनी हे दर लागू करताना अमेरिकेत सदर कंपन्यांना उत्पादन करण्याचं आवाहन केलं आहे. पण अमेरिकेत उत्पादन करणं हे टॅरिफ दरांइतकंच महाग ठरण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, चीनमध्ये आयफोन बनवण्यासाठी मजुरी खर्च ३० डॉलर्स येत असेल, तर अमेरिकेत हाच मजुरी खर्च ३०० डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे हा पर्यायदेखील कंपन्यांसाठी खर्चिकच ठरेल. या पार्श्वभूमीवर चीनमधून अमेरिकेत उत्पादन हलवणं कंपन्यांसाठी जिकिरीचं ठरणार असून दोन्ही देशांमध्ये चालू असणारं टॅरिफ वॉर लवकरात लवकर संपुष्टात यावं, या प्रतीक्षेत चीनमधील सर्व कंपन्या असल्याचं दिसून येत आहे.