सरन्यायाधीशांचा ठाकरे गटाच्या वकिलांना सवाल, सत्तासंघर्षांवर युक्तिवाद पूर्ण
नवी दिल्ली : विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगणारी तत्कालीन राज्यपालांची कृती बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले, तरीही स्वत:हून राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना परत कसे आणता येईल, असा सवाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांना गुरुवारी केला. राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठासमोरील सुनावणी संपली असून, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. गेल्या जून महिन्यात शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर, शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एकमेकांविरोधात सहा याचिका दाखल केल्या होत्या. त्यापैकी शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका सर्वाधिक महत्त्वाची ठरली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्ण मुरारी, न्या. शहा व न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर १४ फेब्रुवारीपासून चार आठवडे नियमित सुनावणी घेण्यात आली. गुरूवारी अखेरच्या दिवशी ठाकरे गटाचे वकील ए. एम. सिंघवी यांनी राज्यपालांच्या आदेशापूर्वीची स्थिती पुनस्र्थापित करण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, ‘तुम्ही विधानसभेत विश्वासदर्शक ठरावात पराभूत झाला असतात, तर ही मागणी तार्किक ठरली असती. रद्द ठरविलेल्या विश्वासदर्शक ठरावामुळे तुमची सत्ता गेल्याचे स्पष्ट झाले असते. मात्र काही कारणाने तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला नाहीत. आपण अल्पमतात असल्याचे मान्य केलेले सरकार परत स्थापित करण्यास न्यायालयाला सांगितले जात आहे.’ घटनापीठातील एक सदस्य न्या. एम. आर. शहा १५ मे रोजी निवृत्त होत असल्याने त्याआधी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा