केंद्र सरकार पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Scheme) सध्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६,००० रुपये देतं. या योजनेचा १० वा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला. दर ४ महिन्यांनी २,००० रुपयांचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. वर्षात तीनवेळा हे पैसे जमा होतात. ज्या शेतकऱ्यांना अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन याबाबत चौकशी करता येईल आणि आपल्या अर्जाचं स्टेटस माहिती करून घेता येईल. मात्र, पीएम किसान योजनेत ही एकमेव योजना नाही. याशिवाय शेतकऱ्यांना वार्षिक ४२ हजार रुपये मिळतील अशीही एक योजना सरकारने सुरू केली आहे.
शेतकऱ्याला वर्षाला ४२ हजार रुपये देणारी योजना कोणती?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दरमहा ३,००० रुपये देणारी योजना देखील सुरू केली आहे. यानुसार वर्षाला या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला ३६ हजार रुपये मिळतात. शिवाय आधीच्या योजनेचे वर्षाला ६,००० रुपये असे मिळून तुम्हाला वर्षाला ४२ हजार रुपये मिळू शकतात. मात्र, यासाठी सरकारच्या काही अटीही आहेत. या योजनेचं नाव पीएम किसान मानधन योजना असं आहे. या योजनेत शेतकऱ्यांना निवृत्तीवेतनाच्या स्वरुपात दरमहा ३ हजार रुपये दिले जातात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कराल?
या योजनेसाठी ज्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना अर्ज करण्याची गरज नाही. त्यांना वेगळी कोणतीही कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही. कारण सरकारकडे संबंधित शेतकऱ्यांची सर्व माहिती जमा आहे. पीएम किसान योजनेत सध्या मिळत असलेल्या लाभासोबतच निवृत्तीवेतन स्विकारण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही वेगळे पैसे जमा करण्याची गरज राहत नाही. या निवृत्तीवेतनाच्या योजनेचा हप्ता आपोआप पीएम किसान योजनेतून कपात होतो.
हेही वाचा : PM KISAN चा हप्ता मिळाला नाही? ‘हे’ कारण असू शकतं, वाचा दुरुस्ती कशी कराल?
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं?
निवृत्तीवेतनाच्या योजनेसाठी पात्र होण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचं वय १८ ते ४० वर्षे असायला हवं. तसेच आपल्या नावावर २ हेक्टरपर्यंत शेती असायला हवी. असं असल्यास शेतकऱ्यांच्या वयानुसार २० ते ४० वर्षांसाठी शेतकऱ्याला ५५ रुपये ते २०० रुपये मासिक योगदान भरावे लागते. यानंतर हा शेतकरी ६० वर्षांचा झाल्यानंतर त्याला दरमहा ३ हजार रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे.