जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख ब्राझीलला जाणार
झिका रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जनुक संस्कारित डासांचा वापर करावा लागेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, खरेतर जनुकसंस्कारित डासांचा वापर ब्रिटनच्या ऑक्सिटेक कंपनीने केल्यानंतर झिकाचा डासामार्फत होणारा प्रसार वाढला होता, त्यामुळे जनुकसंस्कारित डासांचा वापर करण्याबाबत वाद आहेत.
झिका विषाणू युगांडातील जंगलात १९४७ मध्ये पहिल्यांदा सापडला होता. या विषाणूचे अस्तित्व लागण झालेल्या गर्भवती महिलांच्या नवजात बालकांच्या मेंदूत आढळून आले आहे. त्या रोगाला मायक्रोसेफली असे म्हणतात. त्यामुळे ब्राझील व फ्रेंच पॉलिनेसियात डोके लहान असलेली अनेक बालके जन्माला आली आहेत. झिका ही आता जागतिक आपत्ती असून जन्मदोषांशी त्याचा काही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख मार्गारेट चॅन या पुढील आठवडय़ात ब्राझीलला जात असून तेथे प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेणार आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जनुकसंस्कारित डासांचा वापर करावा लागेल, त्याच्या चाचण्या केमन बेटांवर यशस्वी झाल्या आहेत, तेथे प्रजोत्पादनक्षम नसलेले डास सोडण्यात आले होते, त्यांचे जंगली डासांच्या माद्यांशी मिलन झाले तरी नवीन डास तयार होत नाहीत. यात डास नियंत्रणासाठी नवीन व जुनी दोन्ही तंत्रे वापरावी लागणार आहेत.
काही तज्ज्ञांची सावध भूमिका
जनुकसंस्कारित डासांचा वापर करण्याबाबत काही तज्ज्ञांनी सावध भूमिका घेतली असून त्यामुळे फायदा होईल की पर्यावरणाचे नुकसान होईल, हे वापरानंतरच समजेल, असे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ जिमी व्हिटवर्थ यांनी सांगितले.