UIADI चा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये ऑटो सेव्ह कसा झाला हे समजायला आपल्याला आजचा दिवस उजाडावा लागला. मात्र शुक्रवारपासून यासंदर्भात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर सोशल मीडियाचे अभ्यासक आणि लेखक विनायक पाचलग यांनी ब्लॉगद्वारे आपल्या शंकांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तोच ब्लॉग खास लोकसत्ताच्या वाचकांसाठी.

गेले काही तास अचानक काही मोबाईल मध्ये सेव्ह झालेला आधार चा संपर्क क्रमांक आणि त्याने आलेल्या अखंड अफवांचे पेव फुटलेले आहे. त्याबद्दल शक्य तेवढी सत्य माहिती व तर्क देत आहे. ज्याने निदान काही शंकाचे निरसन होईल.

आपण फोन वापरत असताना जवळपास सर्वच अॅपना ” कॉन्टॅक्टस” ची परमिशन देतो. ही परमिशन दिल्यानंतर ते अॅप आपले सर्व कॉन्टॅक्ट्स वापरू तर शकतेच शिवाय आपल्याला न सांगता एखादा क्रमांक सेव्हही करू शकते ही बाब लक्षात घ्या म्हणजे क्रमांका ऑटो सेव्ह का झाला याचे उत्तर मिळू शकते. अँड्रॉईड ही ओ एस गुगल ची आहे, त्यामुळे त्यांना तर असे कॉन्टॅक्टस कधीही अॅड करता येणे अगदी सहज शक्य आहे. ते काही क्रमांक त्यांचा सेट अप विझर्ड मध्ये देतात, ज्यामुळे हे शक्य होते. आता अचानक एखाद्या फोन मध्ये आधार चा कॉन्टॅक्ट नंबर दिसणे हे एखाद्या अॅपमुळे किंवा गुगल मुळे प्रोग्रामटीकली झालेले असू शकते. त्यात हॅकिंग वगैरे काही असायची शक्यता फारच धूसर आहे. धन्या राजेंद्रन यांच्या वॉल वर लिहिल्यानुसार गुगलच्या सेट अप विझर्ड मध्ये हा क्रमांक २०१४ साली होता आणि तो त्यांनी सगळ्या ओ इ एम ना दिलेला होता. तो आता काही कारणाने ट्रिगर झाला असावा. ही कारणे एखाद्या अॅपचे अपडेट होणे इथपासून ओ एस चे अपडेट होणे अशी काहीही असू शकतात.

शुक्रवारी झालेले बदल सगळ्याच फोनवर घडलेले नाहीत. कारण प्रत्येकाची अँड्रॉइड ची व्हर्जन व ओ इ एम चे सिक्युरिटी फीचर्स वेगळे असतात. त्यामुळे ही घटना सार्वत्रिक नाही ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. अशीही एक वेगळी शक्यता आहे की काही जणांकडे हा क्रमांक २०१४ पासूनच आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह आहे पण आजवर तिकडे लक्षच गेलेले नाही. आज आधार म्हटले की एवढे संशयाचे भूत निर्माण केले आहे की आपल्याला ते आज जाणवले असावे. यु आय डी ए आय ने फक्त हे आम्ही केलेले नाही एवढाच खुलासा केला आहे. त्यामुळे, हे कोणी केले हे शोधण्यासाठी ज्यांच्याकडे हा नंबर दिसला त्यांचा मोबाईल डिव्हाईस, ओ एस व्हर्जन, त्यांच्या फोनवर असणारी अॅप असे बरेच मुद्दे तपासावे लागतील व त्यातून शोध घ्यावा लागेल, तसा शोध लोक घेत असतीलच.

प्रथम दर्शनी तरी हा हॅकिंग चा प्रकार वाटत नाही. याचा आणि तुमच्या आधार सुरक्षिततेचा तरी शून्य संबंध आहे. आपण स्वतः च काही अॅपना अगदी ” रूट” परमिशन दिलेल्या आहेत, त्यामुळे आपला मोबाईल हा व्हलनरेबल आहे यात शंका नाही. पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. एखादा क्रमांक ऑटोमॅटिक सेव्ह होणे हा त्यातल्या त्यात सर्वाधिक हार्मलेस प्रकार आहे. याहून अजून डाटा चोरीच्या गोष्टी अॅप्स मधून सुरू असतात. त्यामुळे, सध्या तरी तुम्ही निवांत राहायला हरकत नाही . एका अँड्रॉइड अॅप बनवणाऱ्या कंपनीचा चालक आणि सोशल मीडियाचा अभ्यासक या दोन्ही भूमिकेतून जेवढी माहिती मला आहे त्यावर वरील मुद्दे आधारीत आहेत. त्यात काही चूक असेल तर ती निदर्शनास आणून द्यावी, दुरुस्ती केली जाईल . जशी अधिक माहिती मिळेल तशी अपडेट करिनच

विनायक पाचलग

Story img Loader