उत्तर प्रदेश पोलिसांनी बदायूं आणि अमरोहा येथील हायटेक आधार कार्ड फ्रॉडचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात १२ राज्यांतील १५०० हून अधिक आधार कार्ड्सच्या बायोमेट्रिक डेटाशी छेडछाड झाल्याची माहिती समोर आली आहे. संभलचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई आणि उपअधीक्षक अनुकृती शर्मा यांच्या पथकाने या प्रकरणात एकूण चार जणांना अटक केली आहे.

हाय टेक फ्रॉड रॅकेट नेमकं काय आहे?

आधार कार्डाशी संबंधित डेटा फ्रॉड करणारी ही गँग आहे. त्यांनी २०० ते ३०० जणांसह फ्रॉडचं जाळं उभं केलं आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, दिल्ली यांसह १२ राज्यांमध्ये हे नेटवर्क पसरलं आहे.

खोटी माहिती देऊन, एजंट असल्याचं भासवून हे लोक माहिती गोळा करत आहेत.

आत्तापर्यंत या गँगने १५०० आधार कार्डातील डेटाशी छेडछाड केली आहे. त्यांना लिंक असलेले मोबाइल क्रमांक बदलले आहेत.

एवढंच नाही तर या आधारे या गँगने खोटी जन्म प्रमाणपत्रं आणि रेशन कार्डही तयार केली आहेत.

डिसेंबर २०२४ नंतर जेव्हा आधार कार्ड संबंधीचे नियम आणखी कठोर करण्यात आले तेव्हा या गँगने त्यांची मोडस ऑपरेंडी बदलली. त्यांनी थर्ड पार्टी पोर्टलद्वारे हा फ्रॉड सुरु ठेवला. उप अधीक्षक अनुकृती शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.

पोलीस अधीक्षक बिश्नोई यांनी काय सांगितलं?

आधार डेटा फ्रॉड प्रकरणात आम्ही आशिष कुमार, धरमेंदर सिंग आणि रौन यांना बदायूं मधून अटक केली आहे. तर कासिम हुसैन नावाच्या एकाला अमरोहामधून अटक केली आहे. या चौघांचंही वय २० वर्षे किंवा त्याच्या आतले आहे. फसवणूक, डेटा चोरी, खोटी सील्स तयार करणे यासह आधार अॅक्ट, आयटी अॅक्ट २०१६ आणि पासपोर्ट कायदा १९६७ या अन्वये विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या राज्यांणध्ये २०० ते ३०० किरकोळ विक्रेत्यांच्या मदतीने या टोळीने त्यांचं जाळं पसरवलं. हे सगळे एजंट किंवा मध्यस्थ म्हणून काम करत होते. ज्या ग्राहकांना त्यांच्या आधार कार्डवर नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाइल नंबर यासारखे तपशील बेकायदेशीरपणे अद्ययावत करायचे होते त्यांच्याकडून कागदपत्रे गोळा करत होते. या कामासाठी ते दोन ते पाच हजार रुपये आकारत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

१५०० हून अधिक आधार कार्डमध्ये छेडछाड करण्यात आली असून, किमान ४०० कागदपत्रांमध्ये जन्मतारीख किंवा मोबाइल नंबरमध्ये बनावट बदल करण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्याच बनावट बायोमेट्रिक अॅक्सेसचा वापर करून नावे आणि पत्ते बदलून रेशन कार्डच्या डेटामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्नही तपासात उघडकीस आला आहे, असे एएसपी अनुकृती शर्मा यांनी सांगितलं.