कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन, पृथ्वीच्या निर्मितीनंतर १० कोटी वर्षांनंतर ग्रहाचा आघात
पृथ्वी व निर्मितीच्या प्रारंभिक अवस्थेतील दुसऱ्या एका ग्रहाची समोरासमोर टक्कर होऊन चंद्राची निर्मिती झाली असल्याचे नवीन अभ्यासात दिसून आले. पृथ्वी त्या ग्रहावर जाऊन आदळली हा आधीचा समज त्यामुळे योग्य नाही. पृथ्वीच्या निर्मितीनंतर १० कोटी वर्षांनंतर थिया हा बाल्यावस्थेतील ग्रह तिच्यावर आदळला होता.
वैज्ञानिकांनी सांगितले की, हा ग्रह पृथ्वीवर आदळला होता व तो आघात ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाला होता हे याआधीच माहिती आहे, पण पृथ्वी थिया या ग्रहावर ४५ अंशाच्या कोनातून आदळली असे जे मानले जाते ते चुकीचे आहे. उलट हा ग्रहच पृथ्वीवर आदळला होता. समोरासमोर टकरीचा चंद्र निर्मितीचा सिद्धांत त्यामुळे खरा असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. लॉसएंजल्समधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी चंद्रावर गेलेल्या अपोलो १२, १५ व १७ मोहिमांतील जे खडक पृथ्वीवर आणले आहेत त्यांचा अभ्यास केला. शिवाय पृथ्वीवरील हवाईच्या पाच व अॅरिझोनातील १ अशा सहा ज्वालामुखी खडकांचा अभ्यासही केला आहे.
पृथ्वीवर या ग्रहाने केलेल्या आघाताचा पुरावा हा खडकांच्या रासायनिक रचनेत आहे. त्यानुसार या खडकांमध्ये ऑक्सिजनचे अणू असून खडकांच्या आकारमानाचा नव्वद टक्के भाग ऑक्सिजन अणूंचा आहे, तर ५० टक्के भाग वजनाचा आहे. पृथ्वीवरील ९९.९ टक्के ऑक्सिजन हा ओ – १६ असून त्याच्या प्रत्येक अणूत ८ प्रोटॉन व ८ न्यूट्रॉन आहेत. असे असले तरी त्यात ओ १७ व ओ १८ या समस्थानिकांचा समावेश आहे. त्यांच्यात एक व दोन न्यूट्रॉन जास्त आहेत. पृथ्वी, मंगळ व इतर ग्रह यांच्यात ओ १७, ओ १६ यांचे विशिष्ट प्रमाण आहे पण ते वेगळे आहे. पृथ्वी व चंद्रांच्या ऑक्सिजन समस्थानिकात फरक दिसून आलेला नाही त्यामुळे चंद्र व पृथ्वी यांच्यात फरक दिसत नाही, असे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक एडवर्ड यंग यांनी सांगितले.
पृथ्वी व थिया एकमेकांवर आपटले असते तर म्हणजेच पृथ्वी थियाला चाटून गेली असती तर चंद्राचा बराच भाग थियावरील द्रव्यांचा बनलेला दिसून आला असता व चंद्रावर ऑक्सिजनची वेगळी समस्थानिके दिसली असती. पण त्यांची समोरासमोर टक्कर झाली आहे कारण पृथ्वी व चंद्र यांच्या रासायनिक रचनेत साम्य आहे. थियावरील द्रव्य हे पृथ्वी व चंद्र यांच्यात सारखेच वाटले गेले व त्यामुळे थियाच्या चंद्रावरील खुणा व पृथ्वीवरील खुणा यात फरक नाही. आघात झाला नसता तर थिया हा बालग्रह वाचला असता व तो नंतर मोठा ग्रह बनला असता. या ग्रहाच्या आघाताने पृथ्वीवरचा पाण्याचा साठा कमी झाला की नाही असा एक प्रश्न आहे त्यावर वैज्ञानिकांचे म्हणणे असे की, या आघातानंतर लाखो वर्षांनी काही लघुग्रह पृथ्वीवर आदळले त्यात पाणी होते त्यामुळे पृथ्वीवरचे पाणी वाढले. मंगळही अशा आघातांपासून वाचलेला आहे. सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा