Pushpa 2 Allu Arjun Arrested : तेलुगू सिनेमांमधील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन सध्या “पुष्पा २: द रुल” या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ४ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रिमियर शो ठेवण्यात आला होता. यासाठी अल्लू अर्जुन अचानक संध्या थिएटरमध्ये पोहोचल्यामुळे एकच गोंधळ उडाला. चाहत्यांनी त्याला जवळून पाहण्यासाठी धावाधाव केली. त्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून त्यात ३५ वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मुलगाही गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अल्लू अर्जूनने केलेल्या कृतीमुळेच चेंगराचेंगरी झाल्याचा दावा तेलंगणा पोलिसांनी केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलीस प्रशासनाने सांगितलं की, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी घेण्याकरता पोलीस ठाण्यात भेट दिली जाते. परंतु, अल्लू अर्जून परवानगीकरता आले नव्हते. आम्हाला काही राजकीय व्यक्ती, चित्रपट सेलिब्रिटी, धार्मिक कार्यक्रम इत्यादींचा हवाला देऊन बंदोबस्त करण्याकरता अनेक विनंत्या येतात. परंतु, प्रत्येक कार्यक्रमासाठी बंदोबस्त प्रदान करणं आमच्या संसाधनाच्या पलीकडे आहे. या प्रकरणात आयोजकांनी फक्त आवक विभागात पत्र सादर केले होते. तरीही आम्ही योग्य व्यवस्था केली होती.
पोलीस म्हणाले, अल्लू अर्जुन थिएटरमध्ये येइपर्यंत गर्दी नियंत्रणात होती. तेवढ्यात अल्लू अर्जून त्याच्या सन रुफ गाडीतून बाहेर आला आणि त्याने सर्वांना हातवारे करत प्रेक्षकांना संबोधन केलं. यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर गर्दी जमली. त्याच्या गाडीला जागा करण्यासाठी त्याच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली. तसंच, जवळपास दोन तासांहून अधिक काळ अल्लू अर्जुन थिएटरमध्येच होता.”
अल्लू अर्जुनला दिलासा
अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल झाला असून आज त्याला अटकही करण्यात आली. तसेच त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर अल्लू अर्जुनने अटकेपासून सुटका मिळविण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. तर दुसरीकडे ज्या महिलेचा मृत्यू झाला, त्या महिलेचा पती भास्कर याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याला अल्लू अर्जुनच्या अटकेची माहिती नाही आणि तो अभिनेत्याच्या विरोधातील सर्व तक्रारी मागे घेण्यास तयार आहे. माध्यमांशी बोलताना भास्करने सांगितले, “अल्लू अर्जुनविरोधातील तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे. चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही. चेंगराचेंगरीच्या घटनशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही.”
अल्लू अर्जुनची आजची रात्र तुरुंगात
अल्लु अर्जुनचा जामीन मंजूर करण्यात आला असला तरीही त्याला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. उद्या सकाळी तो तुरुंगाबाहेर येईल, असंही वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.