एका नामांकित कार कंपनीतील नोकरी सुटल्यानंतर तरुणाने गुंडांची एक टोळी बनविली आणि लूटमार व सोनसाखळ्या चोरी करणाऱ्या या टोळीचा तो म्होरक्या बनला. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद पोलिसांनी त्या तरुणाला आणि त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्यातील दोन जण उच्चशिक्षित आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा मोबाइल, तीन चाकू आणि ३८ हजार रुपये आणि अन्य काही सामान जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन, अनुराग, विवेक आणि प्रशांत अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. या टोळीतील अनुराग तिवारी याने एमबीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका नामांकित कार कंपनीमध्ये एचआर अधिकारी म्हणून नोकरी करत होता. याशिवाय अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी पवन हा डेंटल क्लिनिक चालवायचा. 2017 मध्ये अनुरागची नोकरी सुटली, त्यामुळे त्याला पैशांची चणचण भासू लागली आणि खर्चावर मर्यादा आली. चांगली नोकरी न मिळाल्याने त्याला स्वतःचे वेगवेगळे शौक पूर्ण करण्यात अडचणी येऊ लागल्या. त्याचवेळी मेरठमध्ये डेंटल क्लिनिक चालवणाऱ्या पवन याच्याशी संपर्कात तो आला. डीडीएमचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पवन डेंटल क्लिनिक चालवत होता, पण त्याची कमाई चांगली होत नव्हती. त्यामुळे या दोघांनी एक टोळी बनवली आणि लुटमार आणि सोनसाखळ्या चोरायला सुरूवात केली. पोलिसांनी या टोळीतील चार जणांना अटक केली आहे. अन्य काही जणांचा अद्याप शोध सुरू आहे.
अटक केलेला अनुराग हा रात्रीच्या वेळी किंवा निर्जन स्थळी रस्त्यावर उभा रहायचा. त्यानंतर येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या थांबवून मालकाशी इंग्रजीत बोलून तो लिफ्ट किंवा रस्ता विचारायचा. तोपर्यंत दबा धरून बसलेले इतर सहकारी लुटमार करायचे. लुटलेल्या पैशातून शॉपिंग करायची आणि उरलेल्या पैशांची पार्टी हे चोर करायचे.