ब्रिटनमधील मुस्लीम गट आणि व्यक्तींची ‘धोकादायक’ खाती बंद करण्याचा निर्णय जागतिक स्तरावरील ‘हाँगकाँग अॅण्ड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन’ (एचएसबीसी) या प्रसिद्ध बँकेने घेतला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे एका नवीन वादाला फोडणी मिळण्याची दाट चिन्हे दिसत आहेत.
‘फिन्सबेरी पार्क’ येथे लंडनमधील सर्वात मोठी मशीद असून त्या मशिदीच्या पदाधिकाऱ्यांसह अन्य संस्थांनाही बँकेने यासंबंधी नोटीस जारी करून यापुढे तुमची खाती चालविणे शक्य नसल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. ‘इस्लामिक थिंक टँक’लाही अशीच नोटीस बजावण्यात आली आहे. तुमची खाती चालविण्याची बाब धोक्याची वाटत असल्यामुळे ती यापुढे चालविता येणार नाहीत, असे बँकेने या सर्वाना स्पष्ट केले आहे. हा निर्णय कोणत्याही जाती अथवा धर्माला अनुलक्षून नसल्याचेही बँकेकडून सांगण्यात आले. मात्र, बँकेने हा खुलासा केला असला तरी लंडन व अन्यत्रही या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटून त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आर्थिक वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
आमच्या ग्राहकांशी असलेल्या संबंधांविषयी आम्ही कोणतीही चर्चा करीत नाही. जातीधर्माच्या आधारे ग्राहकांमध्ये भेदभाव करणे अस्वीकारार्ह तसेच नैतिकतेलाही धरून नाही. अशा प्रकारे विचार करून बँकिंग क्षेत्रातील निर्णय घेतले जात नाहीत, असे बँकेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ‘फिन्सबेरी पार्क’ मशिदीच्या विश्वस्तांपैकी एक, खलीद ओमर यांनी या पत्राच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करून असा निर्णय का घेतला आहे, याची कारणमीमांसा बँकेने केलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आमची खाती बंद का करण्यात आली, याचे कारण बँकेने सांगितले नाही, असे ओमर म्हणाले. ब्रिटनमधील मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा प्रचार सध्या करण्यात येत असून आमची खाती बंद करण्याचे तेच एकमेव कारण असावे, असा दावा ओमर यांनी केला. याआधी, साधारण २००५ पर्यंत अबू हामझा याच्याकडून ही मशीद चालविली जात होती.
ब्रिटनमधील मुस्लीम गट, व्यक्तींची ‘धोकादायक’ खाती बंद
ब्रिटनमधील मुस्लीम गट आणि व्यक्तींची ‘धोकादायक’ खाती बंद करण्याचा निर्णय जागतिक स्तरावरील ‘हाँगकाँग अॅण्ड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन’ (एचएसबीसी) या प्रसिद्ध बँकेने घेतला आहे.
First published on: 31-07-2014 at 04:48 IST
TOPICSएचएसबीसी
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsbc closes some muslim groups accounts in uk