‘तुम्ही आमच्याकडे खाते उघडा, त्याबद्दल करविभागाला आमच्याकडून कोणतीही माहिती दिली जाणार नाही’, अशा प्रकारची आश्वासने देऊन एचएसबीसीच्या भारतीय शाखेतील प्रतिनिधींनी अमेरिकेतील भारतीयांची खाती बँकेत उघडून घेतली, असा गौप्यस्फोट करणारे वृत्त येथील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एचएसबीसीत खातेदार असलेल्या अनिवासी भारतीयांच्या यादीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
एचएसबीसीच्या स्विस शाखांमध्ये असलेल्या भारतीय खातेदारांच्या यादीमुळे गेल्याच आठवडय़ात खळबळ उडाली होती. या पाश्र्वभूमीवर येथील ‘संडे टाइम्स’ या वृत्तपत्राने एचएसबीसीच्या भारतीय शाखेवर करचुकवेगिरीचा सल्ला दिल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. एचएसबीसीच्या भारतीय शाखेतील प्रतिनिधींनी अमेरिकेतील आपल्या कर्मचाऱ्यांतर्फे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय धनाढय़ उद्योजकांशी संपर्क साधला. अमेरिकी प्रशासनाच्या कर विभागाला थांगपत्ता न लागू देता खाती उघडून दिली जातील, अशी आश्वासने या उद्योजकांना देण्यात आली. त्यानुसार विस्कॉनसीन येथील मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. अरविंद आहुजा यांनी एचएसबीसीकडे ५५ लाख पौंडाची गुंतवणूक केली, तर न्यूजर्सीतील वैभव डहाके या उद्योजकाने साडेसहा हजार पौंडांची रक्कम टप्प्याटप्प्याने गुंतवत खाते उघडले. ही बाब अमेरिकी करखात्याच्या निदर्शनास आली असून, आता त्या संदर्भात न्यायालयीन खटला सुरू आहे.
दरम्यान, एचएसबीसी बँकेने नवीन माहिती उघड झाल्यानंतर ब्रिटनमध्ये पानभर जाहिराती दिल्या असून, आपल्या स्विस शाखेने करचुकवेगिरीला प्रोत्साहन दिल्याबद्दल सार्वजनिक माफी मागितली आहे.

Story img Loader