खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या एचएसबीसी (HSBC) बँकेतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर लवकरच गंडांतर येणार आहे. येत्या तीन वर्षांमध्ये 35 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.
वार्षिक नफ्यात 33% घट झाल्याचे उघडकीस आल्यानंतर येत्या तीन वर्षांमध्ये 35,000 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. याशिवाय, आशिया खंडामध्ये फैलाव झालेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे 2020 च्या नफ्यात अजून घट होवू शकते, असा इशाराही कंपनीने दिला आहे.
बँकेचा वार्षिक नफा 33 ट्क्क्यांहून घसरून 13.3 अब्ज डॉलरवर आल्याची माहिती बँकेने मंगळवारी दिली. तसेच, एचएसबीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी नोएल क्विन यांनी नोकरीत कपात करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. Reuters या वृत्तसंस्थेशी बोलताना नोएल क्विन यांनी सांगितले की, “जगभरातील एचएसबीसीच्या शाखांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना या नोकरकपातीचा फटका बसेल. जगभरात कार्यरत असलेल्या आमच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. सध्या एचएसबीसी बँकेत दोन लाख पस्तीस हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कपातीनंतर आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाखांवर येईल”, असेही क्विन यांनी स्पष्ट केले.