जीनिव्हातील एचएसबीसी बँकेतील खात्यात ज्यांच्या नावावर ठोस रकमा आहेत त्यांच्यावर खटले भरण्याची कारवाई प्राप्तिकर विभागाने सुरू केली आहे. आता प्राप्तिकर खात्याने अर्थमंत्रालयाला लिहिले असून, नेमकी किती रक्कम असलेल्यांवर करचुकवेगिरीसंदर्भात कारवाई सुरू करायची, याची विचारणा केली आहे.
वरिष्ठ सूत्रांनी सांगितले, की ज्यांच्या खात्यावर पाच कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम आहे त्यांच्यावर खटले भरले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. फ्रान्स सरकारने जून महिन्यात जीनिव्हातील एचएसबीसी बँकेत खाती असलेल्या लोकांची व त्यांच्या नावावर असलेल्या रकमेची यादी भारताला दिली आहे.
ज्यांच्या खात्यावर पाच कोटी किंवा ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी रक्कम आहे त्यांच्यावर प्राप्तिकर कायद्यानुसार दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे कर मागणी करून ही रक्कम वसूल केली जाईल. सूत्रांनी सांगितले, की प्राप्तिकर खात्याने एचएसबीसी बँकेत खाती असणाऱ्या व यादीत नाव असलेल्यांची छापे टाकून चौकशी केली आहे. या खात्यांमध्ये काही हजारांपासून काही लाखांपर्यंत पैसे आहेत.

Story img Loader