चीनचे विद्यमान अध्यक्ष हू जिंताओ यांनी आपल्या ताब्यातील सर्व पदांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे उत्तराधिकारी या नात्याने क्सी जिनपिंग यांची निवड निश्चित मानली जात आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाची १८वी महासभा येथे भरली असून १४ नोव्हेंबरला तिचा समारोप होणार आहे. समारोपाच्या दिवशी जिनपिंग यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी वयाची सत्तरी पूर्ण करणाऱ्या जिंताओ यांनी घेतलेला पदत्यागाचा निर्णय त्यांच्या निकटवर्तीयांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे. सध्या उपाध्यक्षपदी असणाऱ्या ५९ वर्षीय जिनपिंग यांची अध्यक्षपदाच्या नावासाठी जोरदार चर्चा असल्याचे वृत्त ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ने दिले आहे. अध्यक्षपदाव्यतिरिक्त सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदीही जिनपिंग यांचीच वर्णी लागणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. येत्या वर्षअखेपर्यंत जिंताओ यांच्याकडेच चीनची सूत्रे राहणार असून नववर्षांत नेतृत्वाचा खांदेपालट होईल, असे सूत्रांनी
सांगितले.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीन अधिक पारदर्शक होईल..
नव्या नेतृत्वाच्या कारकीर्दीत चीनच्या व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येईल, अशी आशा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांनी व्यक्त केली आहे. १९७०च्या दशकात अमेरिका आणि चीनमध्ये संवादाची प्रक्रिया सुरू करण्याच्या कामी पुढाकार घेणाऱ्या ८९ वर्षीय किसिंजर यांनी ‘चायना डेली’ या वृत्तपत्रात हे मत व्यक्त केले आहे.
येत्या १० वर्षांत चीनच्या अर्थकारणात, समाजकारणात व परराष्ट्र धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता किसिंजर यांनी वर्तवली आहे. नव्या नेतृत्वाखाली चीनच्या सर्व व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येईल तसेच त्यांच्या न्यायव्यवस्थेतही सुधारणा होईल, अशी आशा आहे. या १० वर्षांत सर्वाधिक बदल शेतकऱ्यांच्या राहणीमानात होण्याची चिन्हे असून सुमारे ४० कोटी शेतकरी नागरीकरणाकडे वळतील आणि चीनच्या अर्थकारणापुढे व पायाभूत सुविधांसमोर ते मोठे आव्हान असेल. याशिवाय सर्व क्षेत्रांतील विक्रमी उत्पादनांमुळे चीनला आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही, आदी आडाखे किसिंजर यांनी मांडले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hu jintao to step down xi jinping the most powerful