Blast in IOC Plant Vadodara in Gujarat गुजरातच्या वडोदरामधील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीलत आज दुपारी मोठा स्फोट झाला. वडोदराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी हा स्फोट झाला. या स्फोटात आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं किंवा कुणी जखमी झाल्याचं वृत्त नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट रिफायनरीमधील स्टोरेज टँकमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. स्फोट झाल्यानंतर रिफायनरीमध्ये आगीचा भडका उडाला. त्यामुळे रिफायनरीच्या वर आगीचे लोळ आणि धुरामुळे आकाश काही काळ झाकोळलं गेल्याचं दृश्य पाहायला मिळालं.
आग लागल्याची माहिती मिळतात स्थानिक प्रशासनाकडून तातडीनं पावलं उचलण्यात आली. अग्निशमन विभागानं आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे रिफायनरीमधील अंतर्गत अग्निशमन यंत्रणेद्वारेही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आग्निशमन विभागाकडून घटनास्थळी १० बंब पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
रिफायनरीमध्ये स्फोट आणि त्यापाठोपाठ लागलेल्या आगीमुळे आसपासच्या परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून अद्याप या आगीसंदर्भात अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. या आगीमुळे जवळपास २० वर्षांपूर्वी अशाच प्रकारे रिफायनरीत लागलेल्या आगीच्या आठवणी ताज्या झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
काय घडलं होतं २० वर्षांपूर्वी?
२००५ साली गुजरातमधील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या रिफायनरीत मोठा स्फोट झाला होता. त्यापाठोपाठ लागलेल्या भीषण आगीत १३ कामगार होरपळून गंभीररीत्या जखमी झाले होते. रिफायनरीतील फ्लुएड कॅटेलिटिक क्रॅक्रर अर्थात FCC प्लँटमध्ये हा स्फोट झाला होता. त्यानंतर लागलेली आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल ४ तास अथक मेहनत करावी लागली. २०१० सालीदेखील अशाच प्रकारची एक आग रिफायनरीतील जीआर प्लँटच्या मागच्या बाजूला लागली होती. पण या आगीचं स्वरूप सामान्य होतं. त्यात कुणीही जखमी झालं नाही.