अत्तराच्या कुपीतून ‘अल्फाज’ निवडून जगण्यातील खोलपण सांगणाऱ्या शायर मिर्झा गालिब यांची पुराण्या दिल्लीतील हवेली वर्षभरात पहिल्यांदाच त्यांच्या चाहत्यांनी गजबजली होती. गालिब यांच्या २१८ व्या जयंतीनिमित्त रविवारी त्यांच्या चाहत्यांनी पुराण्या दिल्लीतील टाऊन हॉलपासून बल्लिमारनपर्यंतच्या हवेलीपर्यंत मेणबत्ती हातात घेत मिरवणूक काढली. दिल्ली सरकारमधील मंत्री इमरान हुसैन व शायर फिरोज अहमद बख्त ही त्यातील प्रमुख नावे. काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी कधीही गालिब यांच्या हवेलीकडे दुर्लक्ष केले नाही. शायर ए आझम गालिबचा वाढदिवस असला की गुलजारदेखील उपस्थिती लावत असत; पण यंदा गालिब यांचा वाढदिवस काहीसा रितेपणानेच साजरा झाला.
गेल्या पाच वर्षांपासून गालिब स्मारकाचा प्रस्ताव दिल्ली सरकारकडे रखडलेला आहे. दीक्षित यांनी जाता-जाता त्यास प्राथमिक मंजुरी दिली होती; पण आम आदमी पक्षाचे सरकार आल्यावर हा प्रस्ताव अजूनच थंड बस्त्यात गेला. बल्लिमारनच्या गालिब यांच्या हवेलीस अतिक्रमणाने वेढले आहे. त्यावरही गालिबच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. या हवेलीत गालिब यांची काही छायचित्रे, त्यांनी वापरलेले कपडे, त्यांच्या पत्नीचे दागिने आहेत. नेमस्त वास्तूच्या भिंतींवरील गालिब यांच्या पंक्ती सदाबहार वाटतात. निझामुद्दीन परिसरात असलेली गालिब यांची मजार दुर्लक्षित आहे. तेथे सरकारचा साधा फलकदेखील नाही. दिल्लीच्या पर्यटन स्थळांमध्ये पुराण्या दिल्लीतील गालिब यांची हवेली, रझिया सुल्तान यांची मजारचा सरकारला विसर पडला आहे. सरकारच्या लेखी या स्थानांना पर्यटन स्थळाचे महत्त्व नाही.
गालिब यांच्या हवेलीस पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी दिल्लीच्या गालिब अकादमीने दिल्ली सरकारला कित्येक पत्रे लिहिलीत. तरीही गालिब यांची हवेली दुर्लक्षितच राहिली. गालिब यांच्या वाढदिवशी हवेलीच्या परिसरात काहीशी रेलचेल वाढली होती; पण त्यातील गालिबप्रेमी कमीच होते. होते ते बघे. पन्नासेक जण गालिब यांच्या आठवणी ताज्या करीत, त्यांच्या शेरोशायरींची आठवण सांगत त्यांचा वाढदिवस साजरा झाला. हवेलीच्या भिंतीवरील गालिब यांचेच शब्द जणू सांगत होते – उग रहा दरो दिवार पे सब्जा गालिब, हम बयाबां में हैं और घरपे बहार आई हे..!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा