Edible Oils Price Cut In India : येत्या काही दिवसात सर्वसामान्य गृहिणींना किचनच्या बजेटमधून मोठा दिलासा मिळणार आहे. कारण पुढील आठवड्याभरात खाद्यतेलाच्या किंमतांमध्ये मोठी घसरण होणार आहे. सरकारच्या सुचनेनंतर अनेक खाद्यतेल कंपन्यांनी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात आता मदर डेअरी कंपनीने आपल्या धारा खाद्य तेलाचे दर तात्काळ १५ ते २० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक बाजारपेठेत कमी झालेल्या तेलाच्या किमती आणि देशांतर्गत वाढती तेलाची उपलब्धतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मदर डेअरीच्या म्हणण्यानुसार, सुधारित एमआरपी स्टॉक पुढील आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. मदर डेअरीच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, धारा खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत (MRP) सर्व प्रकारांमध्ये प्रति लिटर १५ ते २० रुपयांनी कमी केली जात आहे. सुधारित MRP साठा पुढील आठवड्यात बाजारात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमतीत झालेली घसरण आणि देशांतर्गत वाढती उपलब्धता यामुळे सोयाबीन तेल, राइस ब्रॅन तेल, सूर्यफूल तेल आणि शेंगदाणा तेलाच्या दरात मोठी कपात करण्यात आल्याचे मदर डेअरीचे प्रवक्ते म्हणाले. मदर डेअरीने गेल्या वर्षी जुलैमध्ये देखील दरात कपात केली होती.
मदर डेअरी कंपनीच्या तेलाचे नवीन दर:
तेलाचे प्रकार | आधीचे दर | नवीन दर |
धारा शेंगदाणा तेल | २५५ | २४० |
धारा रिफाइंड सोयाबीन तेल | १७० | १५० |
धारा रिफाइंड राइस ब्रॅन तेल | २०५ | १७० |
धारा रिफाइंड सूर्यफूल तेल | १७५ | १६० |
न्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी नवी दिल्लीतील प्रमुख उद्योग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत खाद्यतेलाच्या किंमतीत झालेली घसरण त्वरीत ग्राहकांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशा सुचना केल्या आहेत.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, आयात केलेल्या खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती घसरत आहेत ज्यामुळे भारतातील खाद्यतेलाच्या क्षेत्रात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन असोसिएशन ऑफ इंडिया (SEAI) आणि इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशन (IVPA) चे प्रतिनिधी जागतिक किमतीतील घसरणीदरम्यान खाद्य तेलाच्या किरकोळ किमतींमध्ये आणखी कपात करण्यावर चर्चा करण्यासाठी उपस्थित होते.