Hair Heist: पैशांची, मूल्यवान वस्तूंची चोरी होते, अशा अनेक बातम्या आपल्या कानावर येत असतात. पण कोट्यवधींचे केस चोरीला जाऊ शकतात, या बातमीवर कुणालाही विश्वास बसणार नाही. पण बंगळुरूमध्ये अशी चोरी झाली आहे. बंगळुरूच्या लक्ष्मीपूर येथील गोदामातून चोरांच्या टोळीने ९० लाख ते १ कोटी रुपयांचे केस चोरले आहेत. हे केस चीन, बर्मा आणि हाँगकाँगला निर्यात केले जाणार होते. मात्र २८ फेब्रुवारी रोजी सहा जणांच्या टोळक्याने गोदामातून केस चोरले. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाली आहे.

काही दिवसांपूर्वी चीनमधील खरेदीदारांनी गोदामाला भेट देऊन पाहणी केली होती. चीनमधील विग बनविणाऱ्या कंपनीला केसांची आवश्यकता होती. या दौऱ्यानंतर काही दिवसांनी ही चोरी झाली आहे. गोदामाचे मालक वेंकटरमण यांनी चोरीनंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे चोरांचा तपास सुरू केला आहे.

चोरांना गोदामात असलेला साठा आणि त्याची बाजारातील किंमत आधीपासूनच माहीत असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या चोरीमागे गोदामातीलच एखाद्या कर्मचाऱ्याचा हात आहे की, मानवी केसांचा व्यापार करणाऱ्यांपैकी कुणी टोळीचा वापर करून दरोडा टाकला, याचाही तपास पोलीस करत आहेत.

मागच्या महिन्यात बंगळुरू पोलिसांनी एटीएममधून रोकड चोरणाऱ्या सहा आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. लकी भास्कर या चित्रपटापासून प्रेरणा घेत, या टोळक्याने ही चोरी केली होती. कॅश मॅनेजमेंट कंपनी सिक्योर व्हॅल्यू प्रा. लि. चे कर्मचारी एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी आणलेले पैसे चोरताना आढळले होते. महालक्ष्मी लेआऊट पोलिसांनी टोळीला जेरबंद केले आणि ५२ लाखांची रोकड हस्तगत केली. टोळीतील चोर हे कॅश मॅनेजमेंट कंपनीतील प्रमुख अधिकारी आणि एटीएम मशीनची देखभाल करणारे कर्मचारी होते. ही टोळी एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली रोकड लंपास करत होती.

Story img Loader