मानवाला आता उत्क्रांतीच्या संघर्षांत टिकून राहण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज राहिलेली नाही, त्यामुळे त्याच्या बौद्धिक व भावनिक क्षमता दिवसागणिक कमी होत चालली आहे असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी असा दावा केला आहे की, ज्यामुळे आपल्याला मेंदूची बौद्धिक शक्ती मिळते ते जनुकांचे गुंतवणुकीचे जाळे उत्परिवर्तनाला सामोरे जात आहे, शिवाय ही उत्परिवर्तने ही आपल्या आधुनिक समाजाच्या गरजांना अनुसरून निवडली गेली आहेत. आपल्याला जगण्याच्या संघर्षांत बुद्धिमत्तेची गरज आता उरलेली नाही. असे असले तरी आपली बौद्धिक क्षमता कमी होत असल्याने चिंता करण्याचे कारण नाही. कारण तो जेव्हा खरा वास्तववादी प्रश्न होईल त्या वेळी नैसर्गिक निवड कालबाह्य़ ठरवणारे तंत्रज्ञानाधिष्ठित उत्तर त्यावर शोधले गेले असेल, असे ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
या शोधनिबंधाचे प्रमुख लेखक गेराल्ड क्रॅबट्री यांनी म्हटले आहे की, आपल्या बौद्धिक क्षमता व बुद्धिमत्तेशी संबंधित असलेल्या जनुकांचा कमाल वापर यांचा विकास हा काही विखुरलेल्या गटांमध्ये झाला. त्या काळातील परिस्थितीत जीवन संघर्षांत टिकण्यासाठी बुद्धिमत्ता आवश्यक होती व त्यामुळे बौद्धिक विकासाशी संबंधित जनुकातही निवडक स्वरूपाचे दडपण होते. त्यामुळे मानवाची बुद्धिमत्ता वाढत गेली. एका परिसीमेवर पोहोचल्यानंतर आता ती परत उतरणीला लागण्याच्या मार्गावर आहे असा संशोधकांचा दावा आहे. त्यांच्या मते कृषी विकासानंतर शहरीकरण आले, त्यामुळे बौद्धिक अक्षमता निर्माण करणारी उत्परिवर्तने होत गेली.मानवी जिनोममध्ये होत गेलेल्या अपायकारक उत्परिवर्तनांची संख्या व मानवी बुद्धिमत्तेसाठी आवश्यक मानली गेलेली दोन ते पाच हजार इतक्या जनुकांची संख्या यांचा तुलनात्मक विचार करून क्रॅबट्री यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, तीन हजार वर्षांत म्हणजे १२० पिढय़ांनंतर बौद्धिक क्षमता व भावनिक स्थिरता यांना हानिकारक असलेली दोन किंवा जास्त उत्परिवर्तने घडून येतील. मेंदूविज्ञानातील अलीकडच्या संशोधनानुसार मेंदूच्या कार्यात सहभागी असलेली जनुके हे उत्परिवर्तनास सामोरी जाण्याची शक्यता अधिक आहे. हे संशोधन ‘ट्रेन्डस इन जेनेटिक्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा