अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर रविवारी तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील हजारो स्थानिकांनी देश सोडून जाण्याच्या अपेक्षेने विमानतळाकडे धाव घेतली. मात्र या विमानतळावरुन विमान वाहतूक बंद करण्यात आलेली. तरी वेगवेगळ्या देशांनी पाठवलेल्या काही विमानांनी या विमानतळावरुन उड्डाण केलं. या विमानांमध्ये आपल्याला प्रवेश मिळावा म्हणून काबूलमधील स्थानिक प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओ जगभरामध्ये व्हायरल झाले. अगदी विमानाच्या मागे धावण्यापासून ते विमानाच्या चाकांमध्ये बसून प्रवास करण्याचा धोकाही त्यांनी पत्कारला. मात्र आता याचसंदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नक्की पाहा >> लोकल ट्रेनप्रमाणे एकाच वेळी अनेकांचा विमानात चढण्याचा प्रयत्न; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

अमेरिकन हवाई दलाच्या सी-१७ या विमानाच्या लॅण्डींग गेअरमध्ये मानवी अवशेष आढळून आले आहेत. या विमानाने काबूल विमानतळावरुन अमेरिकन नागरिकांना घेऊन उड्डाण केलं होतं तेव्हा देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात काही जणांनी विमानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लपून प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी द वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या तपासणीदरम्यान लॅण्डीग गेअरमध्ये चाकाजवळ मृतदेहाचे अवशेष आढळून आले. ग्लोबमास्टर प्रकारातील हे अवाढव्य हे विमान अमेरिकन नागरिकांना घेऊन कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर उतरलं होतं.

अफगाणिस्तानवर रविवारी तालिबानने कब्जा केला. तालिबानने राजधानी काबूलवर ताबा कब्जा करत शांततापूर्ण मार्गाने सत्तांतरण सुरु असल्याचं जाहीर केलं. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर करण्याची तयारी तालिबानने सुरु केल्याची माहिती समोर आली. तालिबानने काबूलवर ताबा मिळवण्यास सुरुवात करताना नागरिकांनी पलायन करण्यासाठी विमानतळावर गर्दी केल्याचं चित्र रविवारी सायंकाळपासून दिसत होतं.

सोमवारी पहाटेसुद्धा हजारो लोक विमानतळावर पहायला मिळाली. सकाळी तर अनेकजण विमानांमध्ये शिरण्यासाठी धडपडताना दिसले. लोक विमानामध्ये चढण्यासाठी धडपडत असली तरी सुरक्षेचा उपाय म्हणून अफगाणिस्तान एअरस्पेस म्हणजेच हवाई सीमा बंद करण्यात आल्या असून कोणतेही विमान तेथून उड्डाण करत नसल्याचं सांगण्यात आलं होतं. तरी काही देशांच्या लष्करी विमानांनी या विमानतळावरुन आपल्या नागरिकांना घेऊन उड्डाण केलं.

नक्की पाहा >> Video : तालिबानने ISIS आणि ‘अल-कायदा’च्या ५ हजार दहशतवाद्यांना तुरुंगातून दिलं सोडून

तालिबानने अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर ताबा मिळवल्याने हवाईमार्गानेच देशाबाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने रविवारी सायंकाळपासूनच विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूककोडी पहायला मिळाली. काबूलमधील हमीत करझाई आंतरराष्ट्करीय विमानतळावर हजारो लोकांची गर्दी पहायला मिळाली.

Story img Loader