भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने ‘मिशन गगनयान’साठी डिसेंबर २०२१ चा मुहूर्त ठरवला आहे. डिसेंबर २०२१मध्ये प्रक्षेपक भारतीय अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेपावेल असे इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी बुधवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन गगनयानसाठी २०२२ सालापर्यंतची मुदत दिली होती. पण इस्त्रोने त्यापेक्षा वर्षभर आधीच ही मोहिम प्रत्यक्षात आणण्याच संकल्प सोडला आहे. मिशन गगनयान ही भारताची महत्वकांक्षी मोहिम असून भारत प्रथमच स्वबळावर आपल्या अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे.
इस्त्रोसाठी ही अत्यंत आव्हानात्मक मोहिम असून अवकाशवीरांना प्रत्यक्ष अंतराळात पाठवण्याआधी वेगवेगळया कठिण चाचण्या कराव्या लागणार आहेत. यामध्ये डिसेंबर २०२० आणि जून २०२१ मधील दोन मानवरहित मोहिमांचा समावेश आहे. इस्त्रोला या मोहिमेसाठी आणखी वेगळया प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. क्रू सपोर्ट सिस्टिम, सर्व्हीस मॉडयुल आणि ऑरबिटल मॉडयुल बनवावे लागणार आहे. मिशन गगनयानमध्ये किती अंतराळवीरांना अवकाशात पाठवायचे किंवा तिथे किती दिवस थांबायचे यावर अद्यापपर्यंत काहीही ठरलेले नाही असे सिवन यांनी स्पष्ट केले.
कशी असेल मोहिम
एका क्रू मॉडयूलमधून तीन भारतीयांना अवकाशात पाठवले जाईल. हे क्रू मॉडयूल सर्व्हीस मॉडयूलला जोडले जाईल. ही दोन्ही मॉडयूल जीएसएलव्ही एमके ३ या रॉकेटद्वारे अंतराळात पाठवली जातील. या अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणताना ऑरबिटल मॉडयुल स्वत: आपली दिशा बदलेल. १२० किलोमीटर उंचीवर असताना क्रू आणि सर्व्हीस मॉडयूल वेगळे होतील.
क्रू मॉडयूल अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीच्या दिशेने येत असताना ब्रेकिंग सिस्टिम अॅक्टीव्ह होऊन वेग कमी होईल. त्यानंतर अंतराळवीर अरबी समुद्रात उतरताना पॅराशूट उघडले जातील. परतीचा प्रवास ३६ मिनिटांचा असेल. काही तांत्रिक समस्या उदभवल्यास बंगालच्या खाडीत मॉडयूल उतरवले जातील असे सिवन यांनी सांगितले. भारताने २००४ पासूनच या मोहिमेची तयारी सुरु केली आहे. या मोहिमेमुळे १५ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.