Hundreds Of tourists stranded in North Sikkim Lachen and Lachung : उत्तर सिक्कीममधील लाचेन आणि लाचुंग या दोन हिल स्टेशन भागात भूस्खलना झाले आहे. यामुळे येथे गुरुवारपासून सुमारे १,००० पर्यटक अडकून पडले असल्याची माहिती एका वरिष्ठ जिल्हा पोलिस अधिकार्‍याने शुक्रवारी दिली आहे.

मांगनचे पोलीस अधीक्षक सोनम डेट्चू भूतिया यांनी सांगितले की भूस्खलनामुळे ज्यांची वाहने रस्त्यावर अडकली होती अशा सुमारे १,५०० पर्यटकांना गुरुवारी रात्री जवळच्या गावांमध्ये ठेवण्यात आले आणि शुक्रवारी त्यांची सुटका करण्यात आली. पोलीस स्टेशन, गुरुद्वारा, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस कॅम्प आणि काही ठिकाणी तर स्थानिकांच्या घरामध्ये या पर्यटकांनी रात्र घालवली.

जिल्हा पोलिस प्रमुखांनी सांगितले की, गुरुवारी दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे चुंगथांगहून लाचेनला जाणाऱ्या रस्त्यावर मुनशिथांगजवळ आणि चुंगथांगहून लाचुंगला जाणाऱ्या रस्त्यावर लिमाजवळ अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.

गुरुवारी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने लाचेन आणि लाचुंगमध्ये असलेले पर्यटक अजूनही हिल स्टेशन भागात अडकून पडले आहेत, असे एका वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्याने सांगितले की, रस्त्यांची खराब स्थिती पाहाता उत्तर सिक्कीममध्ये प्रवास करण्यासाठीचे परवाने शुक्रवारी रद्द करण्यात आले होत. तसेच जिल्हा प्रशासनाने टूर ऑपरेटर्सना परिस्थिती सुधारेपर्यंत पर्यटकांना उत्तर सिक्कीममध्ये पाठवू नये असे निर्देश दिले आहेत.

गुरूवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार, लाचेन-चुंगथांग रस्त्यावरील मुनशिथांग येथे आणि लाचुंग-चुंगथांग मार्गावरील लेमा/बॉब येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे.

सिक्किम येथे ग्लेशियर लेक फुटून आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या ठिकाणांपैकी लाचेन हे एक ठिकाण होते. जवळपास दीड वर्ष संपर्क तुटल्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात हे ठिकाण पर्यटकांसाठी खुले झाले होते.