हंगेरीच्या राष्ट्रपती कॅटालीन नोव्हॅक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सामील असलेल्या एका व्यक्तीची शिक्षा माफ केल्यामुळे त्यांच्याविरोधात जनतेतून रोष व्यक्त करण्यात येत होता. या निर्णयाविरोधात हंगेरीतील अनेक लोक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रपती भवनासमोर लोकांचे आंदोलन
नोव्हॅक या हंगेरीचे पंतप्रर्धान विक्टोर ओरबन यांच्या जवळच्या सहकारी मानल्या जातात. त्यांच्या या निर्णयानंतर हंगेरीच्या माजी कायदामंत्री जुडीत वार्गा यांनीदेखील सार्वजनिक जीवनापासून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले. नोव्हॅक यांच्या या निर्णयामुळे हंगेरीतील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तसेच विरोधातील राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून सरकारवर टीका केली जात होती. या निर्णयाला विरोध म्हणून राष्ट्रपतीभवनासमोर लोकांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यामुळे हंगेरीतल सरकार अडचणीत सापडले होते. शेवटी दबाव वाढू लागल्यामुळे हंगेरीच्या राष्ट्रपती कॅटालीन नोव्हॅक यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
जनतेची मागितली माफी
हा राजीनामा देताना ‘मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या निर्णयामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या तसेच मी त्यांच्या सोबत नाही, त्यांना पाठिंबा देत नाही, असे वाटणाऱ्या पीडितांची मी माफी मागते. मी नेहमी लहान मुलं आणि कुटुंबांचे रक्षण करण्याच्या भूमिकेत राहिलेली आहे. भविष्यातही माझी हीच भूमिका असेल,’ असे कॅटालीन नोव्हॅक म्हणाल्या.
राष्ट्रपतींनी कोणाच्या शिक्षेला माफी दिली?
नोव्हॅक यांनी एका बालसुधारगृहाच्या माजी उपसंचालकाची शिक्षा माफ केली. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या बाल लैंगिक अत्याचारावर पडदा टाकण्याचे काम या उपसंचालकाने केले, असा आरोप करण्यात आला होता. मात्र या उपसंचालकाला नोव्हॅक यांनी माफी दिली. गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात पोप फ्रान्सिस यांनी बुडापेस्टला भेट दिली होती. याच काळात नोव्हॅक यांनी या उपसंचालकाची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतला होता.
लॅस्लो कोव्हर हंगामी राष्ट्रपती
दरम्यान, कॅटालीन नोव्हॅक यांनी राजीनामा दिल्यानंतर हंगेरीच्या संसदेचे अध्यक्ष लॅस्लो कोव्हर यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी फोर्ब्सने कोव्हर नोव्हॅक यांचा सार्वजनिक जिवनातील सर्वांत प्रभावशाली महिला म्हणून उल्लेख केला होता.