पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत कारमध्ये बसलेलं पाहून पतीचा संताप अनावर झाला आणि त्यानं पत्नीला चक्क बेसबॉलच्या बॅटनं मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हरयाणाच्या पंचकुला परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. विशेष म्हणजे महिलेचा पती तिला मारहाण करत असताना तिच्यासोबतची दुसरी व्यक्ती तिची सोडवणूक करण्यासाठी पुढे आली नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
हरियाणाच्या पंचकुला परिसरातील एक व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. एक व्यक्ती आपल्या पत्नीला चक्क बेसबॉलनं मारहाण करत असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. सदर महिला एका गाडीत दुसऱ्या एका व्यक्तीसोबत बसलेली असताना पतीनं आधी बेसबॉलच्या बॅटनं गाडीची काच फोडली. नंतर महिलेला गाडीतून बाहेर काढत थेट बॅटनं मारायला सुरुवात केली. या काळात महिला न मारण्यासाठी पतीला विनवण्या करत होती. पती मात्र थांबण्यास तयार नव्हता.
या काळात एकदा गाडीत बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, पतीनं त्याला लांब राहण्यास सांगून पत्नीला मारहाण चालूच ठेवली.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय
पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता अशी माहिती आता समोर आली आहे. पत्नीचे दुसऱ्या पुरुषाबरोबर प्रेमसंबंध असल्याचा दावा पतीनं केला आहे. तसेच, व्हिडीओमध्येही पत्नीला मारहाण करताना पतीनं हे आरोप केल्याचं दिसत आहे. यासंदर्भात पोलिसांनी सविस्तर तपास सुरू केला आहे. पत्नीनं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पतीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.