Woman’s body stored in fridge: दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच घटना बंगळुरूमध्ये घडल्याचे समोर आले होते. महालक्ष्मी नामक २९ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे २० तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. सदर महिला पतीपासून काही वर्षांपूर्वी वेगळी झाली होती. बंगळुरूच्या व्यालिकवल परिसरात ती एकटीच राहत होती. पीडितेच्या पतीने आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे. सदर महिलेचे अश्रफ नावाच्या व्यक्तीशी संबंध होते आणि त्यानेच तिचा खून केला असावा, असा संशय महालक्ष्मीचा पती हेमंत दास याने व्यक्त केला आहे.
हेमंत दास याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, अश्रफ हा उत्तरखंड राज्यातील असून पत्नी महालक्ष्मीच्या खूनात त्याचा सहभाग असू शकतो. त्याच्या विरोधात बंगळुरूच्या पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी तक्रार दाखल झाली होती, असेही दास यांनी सांगितले. दास म्हणाले, “मी काही महिन्यांपूर्वी अश्रफच्या विरोधात नेलमंगला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर त्याला बंगळुरूत येण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. पण त्या नंतर ते कुठे गेले याची मला माहिती नव्हती.”
हेमंत दास आणि महालक्ष्मी हे लग्नानंतर सहा वर्ष एकत्र होते. त्यांना एक मुलगीही आहे. मात्र घरगुती वादानंतर नऊ महिन्यांपूर्वी महालक्ष्मी वेगळे राहू लागली होती. “अश्रफ उत्तराखंडमधून आलेला आहे. महालक्ष्मी आणि त्याचे प्रेम प्रकरण असल्याचे समजल्यानंतर मी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मला संशय नाही तर खात्री आहे की, त्यानेच महालक्ष्मीबरोबर काही बरेवाईट केले असावे. मे २०२३ मध्ये मला यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यानंतर महालक्ष्मीने मला अश्रफबद्दल कळू दिले नाही. मीही तिच्या रोज संपर्कात नव्हतो”, अशी माहिती हेमंत दास यांनी दिली.
हेमंत दास मोबाइल विक्री करणाऱ्या दुकानात काम करतात. महालक्ष्मी एक महिन्यापूर्वी दुकानात आली असताना आमची भेट झाली होती, अशी माहिती दास यांनी दिली.
पोलिसांनी काय सांगितले?
बंगळुरू पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितले की, आम्ही मुख्य संशयिताची ओळख पटवून त्याचा शोध सुरू केला आहे. मात्र याक्षणी आम्ही आरोपीची ओळख उघड करू इच्छित नाही. पोलीस आयुक्त यांनी जरी संशयिताचे नाव जाहीर केले नसले तरी आरोपी कर्नाटक राज्याच्या बाहेरील असल्याचे मान्य केले आहे.
दरम्यान कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरम यांनी सांगितले की, पोलिस या गुन्ह्याचा कसून तपास करत आहेत. आरोपीला लवकरच पकडून ते न्यायालयात सादर करतील. या प्रकरणात एकच आरोपी सामील आहे की, अनेकजणांनी हे कृत्य केले, याचा तपास सध्या केला जात आहे. त्यामुळे याप्रकरणी अधिक माहिती आताच देता येणार नाही.
२० सप्टेंबर रोजी महालक्ष्मीचा मृतदेह राहत्या घरी अतिशय छिन्न-विछिन्न अवस्थेत फ्रिजमध्ये आढळून आला होता. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, तिच्या मृतदेहाचे २० तुकडे करण्यात आले होते. घराबाहेर दुर्गंधी पसरल्यानंतर शेजाऱ्यांनी महालक्ष्मीच्या आईला आणि पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. महालक्ष्मी एका कपड्याच्या दुकानात टीम लीडर म्हणून काम करत होती.