एखाद्या बलात्कार पीडित महिलेला मदत करणे सोडाच तिच्याबद्दल उघडपणे साधी सहानुभूतीही व्यक्त करताना लोक कचरतात. लग्नापूर्वीच जर एखाद्या मुलीवर असा प्रसंग ओढवला असेल तर तिच्याशी कोणी लग्न तरी करेल का? असा प्रश्न काहींना पडू शकतो. मात्र, याला छेद देणारी एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. अशाच घटनेतील पीडित असलेल्या एका पतीने आपल्या अत्याचारीत पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी खडतर लढाईचे शिवधनुष्य पेलले आहे. याची माहिती त्याने आपल्या ब्लॉगच्या माध्यमांतून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंदर असे या पतीचे नाव आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहीताना म्हटले की, हरणायामधील एका गावातील ही घटना आहे. माझे आणि माझ्या पत्नीचे घरच्यांनी जुळवून लग्न झाले होते. सप्टेंबर २०१५ मध्ये आमचा साखरपुडा झाला. त्यानंतर चार महिन्यांपर्यंत लग्न होईपर्यंत आमची एकमेकांशी भेट झाली नाही. कारण, हरयाणातील ग्रामीण भागात साखरपुड्यानंतर भेटण्याची पद्धत नाही. मात्र, आम्ही दोघेही एकमेकांशी फोनवरुन संवाद साधत होते. मी छट्टर येथील तर ती जिंद येथील रहिवासी आहे. या दोन्ही गावांमध्ये सुमारे ३० किमीचे अंतर आहे.

दरम्यानच्या काळात तिने मला फोनवरुन एक महत्वाची गोष्ट सांगण्याची इच्छा व्यक्त करीत कुटुंबियांसोबत पुन्हा एकदा घरी येण्याची विनंती केली. त्यानंतर आठवड्याभराने आम्ही तिच्या घरी गेलो. यावेळी तिने आम्हाला साखरपुड्यानंतर आपल्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचे रडत रडत सांगितले. आमच्यासाठी ही धक्कादायक बातमी होती. हे नातं मला खोट्या पायावर उभारायचं नाही. या लग्नासाठी मी पात्र नाही त्यामुळे तुम्ही माझ्याशी लग्न करु नका, अशी विनंतीही तीनं माझ्याकडे केली. यानंतर माझं मन वारंवार मला याबाबत विचार करायला भाग पाडत होतं. पण जर माझ्या होणाऱ्या पत्नीची काहीही चुक नसताना जर मी तिच्याशी लग्न केलं नाही तर देव मला कधीही माफ करणार नाही, असं मी माझ्या मनाला समजावलं. त्यानंतर मी तिला म्हणालो की मी तुझ्याशी केवळ लग्नच करणार नाही तर तुला न्यायही मिळवून देईन. त्यानुसार आमच्या लग्नापूर्वीच मी या कायदेशीर लढाईला सुरुवात केली.

हरयाणात बलात्काराच्या घटनांचे प्रमाण हे देशातील इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे. अशा घटनांमध्ये मुलीची काहीही चूक नसली तरी आमच्या समाजात यासाठी मुलींनाच जबाबदार धरले जाते. लग्नापूर्वीच जर अशी घटना घडली असेल तर मुलं त्या मुलीशी लग्न करीत नाहीत. त्यांच्या पालकांनाही आपल्या प्रतिष्ठेचा आणि प्रसंगी आपल्या घरातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सतावत असतो.

“दोन आठवड्यांपूर्वी मी माझ्या पत्नीवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा करणारच अशी शपथ घेतली. त्यापूर्वी आम्ही आठ जणांविरोधात एफआयआर दाखल केला. वकिलांकडे खटला सुपूर्द केला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियाही सुरु झाली. आम्ही डिसेंबर २०१५ मध्ये लग्न केले त्यानंतर आमच्या दोघांच्याही कुटुंबियांना आरोपींकडून वारंवार धमक्या आल्या. आमच्या घरावर हल्ले झाले, जाणीवपूर्वक कायदेशीर प्रक्रियेत अडकवण्यासाठी माझ्याविरोधात खोटे खटले भरले गेले, ते खोटे असल्याचे नंतर सिद्धही झाले. या काळात माझे कुटुंबिय माझ्या आणि माझ्या पत्नीच्या कायम सोबत राहिले. मात्र ही लढाई माझ्यासाठी खूपच बिकट होती. या काळात मला खटला मागे घ्यावा आणि त्यासाठी पैसे देण्याचे आमिषही दाखवले गेले,” असंही जितेंदर यांनी म्हटलं आहे.

जिल्हा कोर्टाने तर आरोपींना निर्देष मुक्तही केले. मात्र, मी कोर्टाच्या या निकालाविरोधात हायकोर्टात धाव घेतली. त्यासाठी होणाऱ्या १४ लाखांच्या खर्चासाठी मी माझे दोन भूखंड विकले. कोर्ट जवळ असणाऱ्या गावातच आम्ही राहत आहोत. मला आता इतर वकिलांची फी परवडत नाही आणि त्यांच्यावर माझा विश्वासही राहिलेला नाही. मात्र, मी कायद्याचा विद्यार्थी असल्याने आता स्वतःच पत्नीच्या अत्याचाराविरोधातला खटला लढणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

माझ्या कुटुंबियांनी मला पाठींबा दिल्यामुळेच मी हे करु शकत आहे. त्यांच्या पाठींब्याशिवाय हे मला कधीच शक्य झालं नसतं. न्यायासाठी माझी चाललेली धडपड पाहून आमची पंचायतही आता माझ्या पाठीशी आहे. आत्ता माझी पत्नीही कायद्याचे शिक्षण घेत आहे. आम्हाला दोन वर्षांचा मुलगाही आहे. यानंतर मुलाच्या शिक्षणासाठी आणि पत्नीला कायद्याचे पुढील शिक्षण घेता यावे यासाठी आम्ही चंदीगडमध्ये स्थलांतरीत होणार आहोत. मात्र, त्या नराधमांना मी सोडणार नाही. मोठ्या शहरांमध्ये ज्या प्रकारे ‘मीटू’चे वादळ निर्माण झाले तशीच परिस्थिती छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्येही निर्माण व्हायला हवी. इतर अनेक पीडितांच्यावतीने आणि पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी मी हा बिकट लढा देतच राहणार आहे, अशा प्रकारे जितेंदर यांनी आपल्या भावना ब्लॉगच्या माध्यमातून उघड केल्या आहेत.

या प्रेरणादायी लढ्यावर ‘सन राइज’ नावाचा माहितीपटही येत असून विभा बक्षी या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या हा माहितीपट करीत आहेत.