Hush money case Donald Trump given unconditional discharge : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना कुठलीही शिक्षा देण्यात आली नाही. म्हणजेच त्यांना कुठलाही दंड भरावा लागणार नाही, तसेच ते तुरुंगातही जाणार नाहीत. न्यूयॉर्क न्यायालयाने शुक्रवारी यासंबंधीचा निर्णय दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा येत्या १० दिवसात शपथविधी सोहळा होणार आहे, त्यापूर्वी हा महत्त्वपूर्ण निर्णय सुनावण्यात आला आहे.
कोर्टाने या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे, मात्र त्यांना कोणतीही शिक्षा दिली जाणार नाही. त्यामुळे त्यांचा व्हाईट हाऊसमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच त्यांच्यावरील खटला देखील निकाली निघाला आहे. या निर्णयामुळे एखाद्या प्रकरणात दोषी ठरवले गेल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे डोनाल्ड ट्रम्प पहिले राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत.
शिक्षेच्या सुनावणीवेळी मॅनहॅटन क्रिमिनल कोर्टात डोनाल्ड ट्रम्प हे व्हिडीओ कॉन्फ्रन्सिगच्या माध्यमातून हजर झाले होते. न्यायाधीश जुआन मर्चेन यांनी शुक्रवारी त्यांच्या बीनशर्त सुटकेचा निर्णय सुनावला. या निर्णयानुसार डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले असले तरी त्यांना कोणताही दंड किंवा तुरुंगवास भोगावा लागणार नाही. यानंतर अवघ्या १० दिवसात डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.
सुनावणी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचा पुनरुच्चार केला. तसेच ते अध्यक्ष बनू नयेत यासाठी निवडणुकीच्या आधी त्यांच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले होते असेही ट्रम्प म्हणाले. गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील आरोप सिद्ध झाले होते.
हेही वाचा>> अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान; म्हणाले, “माझ्या भाषणात कधी तुम…
‘हश मनी’ प्रकरण नेमकं काय?
स्टॉर्मी डॅनियल्स या पॉर्न अभिनेत्रीने ट्रम्प यांच्याबरोबर पूर्वी संबंध असल्याचा दावा करून त्यासंबंधी किस्से आणि आठवणी अमेरिकेतील काही प्रकाशकांकडे प्रसिद्धीसाठी पाठवल्या होत्या. त्यांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी ट्रम्प यांनी, २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना स्टॉर्मी डॅनियल्सला १,३०,००० डॉलर्स दिले. हे पैसे ट्रम्प यांचे सहकारी मायकेल कोहेन यांच्या वतीने ट्रम्प यांच्या सांगण्यावरून देण्यात आले. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर कधीतरी ट्रम्प यांनी कोहेन यांना ते पैसे परत केले. परंतु ही देयके कोहेन यांचे मानधन म्हणून देण्यात आल्याचे दाखवले गेले. मे २०२४ मध्ये ट्रम्प हे प्रकरण दडपण्यासाठी आर्थिक हिशोबांमध्ये फेरफार केल्याच्या ३४ गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले होते. आता हे सर्व प्रकरणे निकाली निघाले आहेे.