सोळा जणांचे बळी घेणाऱ्या हैदराबादमधील दोन बॉम्बस्फोटांप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती आल्याचा दावा तपास यंत्रणांनी शनिवारी केला. याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला असला तरी घटनास्थळावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज हाती आले असून त्यात एक व्यक्ती बॅगसह सायकलवरून स्फोटाच्या ठिकाणी येत असल्याचे आढळल्याचे समजते. स्फोटांची कार्यपद्धती व आधी अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी या संघटनेचेच हे कृत्य असावे, याबाबत एकमत बनत चालले आहे. स्फोटांबाबत माहिती देणाऱ्यांस आंध्र प्रदेश पोलिसांनी दहा लाख रुपयांचे इनामही जाहीर केले आहे.
आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या हैदराबाद शहरात दिलसुखनगर येथे गुरुवारी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांचा छडा लावण्यासाठी राज्य सरकारने पंधरा पथके स्थापन केली असून महत्त्वाचे धागेदोरे हाती आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दहशतवादी कारवायांवरून बंदी घातलेल्या इंडियन मुजाहिद्दीनवर या प्रकरणी दाट संशय आहे. या दोन बॉम्बस्फोटांबाबत महत्त्वाची माहिती देणाऱ्यांना दहा लाख रुपयांचे इनाम पोलिसांनी जाहीर केले आहे.
पोलीस आयुक्त अनुराग शर्मा यांनी स्फोटाच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही बंद असल्याचा तसेच त्याच्या वायरी तोडल्या गेल्याचा इन्कार केला. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले, की सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती स्फोटाच्या ठिकाणी बॅगसह सायकलने येताना दिसते आहे. स्फोटाच्या अवधीतील या भागातील मोबाइल फोनच्या नोंदीही तपासल्या जात आहेत.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्री पी. सविता इंद्रा रेड्डी यांनी सांगितले, की आम्हाला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून लवकरच या स्फोटांचा छडा लावला जाईल. गुरुवारी झालेल्या या स्फोटात १६ ठार तर ११७ जण जखमी झाले होते. सविता इंद्रा रेड्डी यांनी सांगितले, की आंध्र प्रदेश पोलिसांची १०-१५ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली पंधरा पथके स्थापन करण्यात आली आहेत.

Story img Loader