हैदराबादमध्ये गुरूवारी अकारण साहस करण्याच्या नादात एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. वसतिगृहाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून समोरच्या इमारतीमधील गॅलरीत उडी मारताना त्याचा पाय सटकला आणि तो थेट खाली कोसळला. या १९ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव साई कृष्णा असून, तो बी.टेकच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता.
काल रात्री हा विद्यार्थी वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेला एका गॅलरीतून दुसऱ्या गॅलरीत उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दुसऱ्या गॅलरीच्या कठड्यावरून त्याचा पाय सटकला आणि तो तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
साई इमारतीवरून खाली पडण्यापूर्वी त्याचा मित्राने तशाच धोकादायक पद्धतीने समोरच्या इमारतीत प्रवेश केला होता. मात्र, साई पहिल्यांदाच अशाचप्रकारचा प्रयत्न करत असावा, असे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बघताना दिसते आहे.

Story img Loader