१५ वर्षीय मुलीवर तीन जणांनी तिच्याच घरात घुसून सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. हैदराबादच्या नंदनवनम कॉलनीत रविवारी सकाळी हा प्रकार घडला. या वेळी चाकूच्या धाकाने या नराधमांनी पीडिता आणि तिच्या भावाला धमकावले.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मद्याच्या नशेत सकाळी साडेनऊच्या सुमारास जबरदस्तीने घरात घुसले. त्यांच्या हातात चाकू होता. त्यांनी चाकू धाक दाखवून धमकावले.
चाकूचा धाक दाखवून घरात शिरल्यानंतर आरोपींनी पीडितेच्या भावाला घराबाहेर ढकलून दिलं. त्यानंतर तिला वरच्या मजल्यावर नेण्यात आलं. तिथंच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने आरडा ओरडा केल्यानंतर आरोपी तिथून पळून गेले.
पोलिसांनी द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पॉस्को) कायदा, २०१२ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली असून पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.