हैदराबादमध्ये आंतरधर्मीय दाम्पत्यावर हल्ल्या केल्याच्या आरोपाखाली चारमीनार पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या आरोपींनी जोडप्यावर हल्ला केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि चार आरोपींना बेड्या ठोकल्या. या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, एक बुरखा परिधान केलेली महिला तिच्या लहान बाळाबरोबर दिसतेय. तसेच तिच्याबरोबर असणारी व्यक्ती (तिचा पती) हिंदू असल्यामुळे या आरोपींनी जोडप्यावर हल्ला केल्याचं व्हिडीओतून समोर आलं आहे.
ही घटना सोमवारी (२५ मार्च) रोजी घडली आहे. परंतु, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. त्यानंतर या आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं. या पथकाने चार जणांना अटक केली असून त्यांचे फोनदेखील जप्त करण्यात आले आहेत. हल्ला होत असताना त्यांच्यापैकीच एकाने त्याचं चित्रण केलं होतं.
हे ही वाचा >> लोकसभा निवडणुकीत प्रहार आणि मनोज जरांगे एकत्र येणार? बच्चू कडू म्हणाले…
चारमीनारचे सहाय्यक पोलीस आयुक्त पी. चंद्रशेखर म्हणाले, चार जणांनी एका जोडप्याबरोबर दुर्व्यवहार केला होता. त्यावेळी महिलेबरोबर तिचं बाळही होती. या आरोपींमुळे महिलेच्या बाळालाही दुखापत झाली आहे. आमच्या विशेष पथकाने या आरोपींना ताब्यात घेतलं असून सोमवारी न्यायालयासमोर उभं केलं जाईल.