प्रेयसीला तिच्या वडिलांनी अमेरिकाला पाठविल्यानंतर संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या वडिलांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना हैदराबाद येथे घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी २५ वर्षीय प्रियकाराला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव बलविंदर सिंग असे आहे. आपली मुलगी आणि बलविंदरचे नाते तोडण्यासाठी वडिलांनी आपल्या मुलीला अमेरिकेला पाठवले होते. मात्र याचा राग मनात धरून आरोपीने पीडित व्यक्तीवर गोळीबार केला. या गोळीबारात पीडित व्यक्तीच्या उजव्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
रविवारी (दि. १० नोव्हेंबर) ही घटना घडली. आरोपी प्रेयसीच्या घरी गेल्यानंतर त्याच्यात आणि प्रेयसीच्या वडिलांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर आरोपी बलविंदर सिंगने आपल्यासह आणलेल्या एअरगन मधून गोळीबार केला. ज्यामध्ये पीडित व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली.
या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांच्या हाती लागले आहे. ज्यामध्ये बलविंदर सिंग आपल्या हातात एअरगन घेऊन आल्याचे दिसत आहे. गोळी झाडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
सरूरनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (खुनाचा प्रयत्न) नुसार आणि शस्त्र कायद्यातील विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तक्रारीमध्ये पीडित व्यक्तीने सांगितले की, बलविंदर सिंग त्यांच्या मुलीला त्रास देत होता. प्रेमाच्या नावावर तिची छळवणूक होत असल्यामुळेच मुलीला अमेरिकेला पाठवले. तसेच या विषयावरून बलविंदर सिंगने याआधीही भांडण केल्याचे तक्रारदारांनी सांगितले. सध्या जखमी वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.