Hyderabad Man Shot Dead In US : नोकरीच्या शोधात असलेल्या भारतीय तरुणाची अमेरिकेत हत्या करण्यात आली. रवी तेजा असं या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रवीला गोळ्या झाडून ठार करण्यात आलं अशी माहिती सोमवारी सकाळी त्याच्या पालकांना मिळाली. रवी तेजा अवघ्या २६ वर्षांचा होता. तो मूळचा हैदराबाद या ठिकाणचा होता. हैदराबादच्या आरके पुरम या ठिकाणी त्याचं घर आहे.
रवी तेजा २०२२ मध्ये अमेरिकेत गेला होता
रवी तेजा मास्टर्सची डिग्री घेण्यासाठी २०२२ मध्ये अमेरिकेला गेला होता. काही दिवसांपूर्वीच त्याचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर तो नोकरीच्या शोधात होता. दरम्यान त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना वॉशिंग्टन अॅव्हेन्यू या ठिकाणी झाली. रवी तेजावर कथित हल्लेखोरांनी थेट गोळीबार केला आणि त्याची हत्या केली अशी माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. रवी तेजाची अशी अचानक हत्या झाल्याने त्याचं कुटुंब शोकसागरात बुडालं आहे.
पोलीस या प्रकरणी करत आहेत पुढील तपास
या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हल्लेखोर कोण होते? त्यांनी नेमकी ही हत्या का केली? याबाबतचा शोध घेत आहेत. रवी तेजाचे वडील चंद्रमौली यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. “मी याबाबत काय बोलणार? मी आज माझा मुलगा गमावला आहे. माझा मुलगा जिवंत अमेरिकेत गेला होता आता त्याचा मृतदेह भारतात येतो आहे. कुणावरही अशी वेळ यायला नको.” असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच या घटनेमुळे त्यांचं कुटुंब पूर्पणे दुःखी झालं आहे.
अमेरिकेत याआधीही घडल्या आहेत अशा घटना
अमेरिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला होण्याची किंवा त्यांना ठार करण्याची ही पहिली घटना नाही. डिसेंबर २०२३ मध्ये एका गॅस स्टेशनवर भारतीय विद्यार्थ्याला ठार करण्यात आलं होतं. त्या विद्यार्थ्याचं नाव तेजा नुकारापु असं होतं. तो तेलंगणातील खम्मम जिल्ह्याचा रहिवासी होता. तसंच अमेरिकेत तो एमबीए करण्यासाठी आला होता. त्यालाही अशाच पद्धतीने ठार करण्यात आलं होतं.
२०२० मध्येही एका विद्यार्थ्याची समाजकंटकांकडून हत्या
२०२० मध्येही अशी एक घटना घडली होती. त्यावेळी भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तो विद्यार्थीही दक्षिण भारतातलाच होता. हैदराबादमध्ये वास्तव्य करणाऱ्या मोहम्मद मुजीबुद्दीनची काही समाजकंटकांनी गोळी झाडून हत्या केली होती.