हैदराबादमध्ये इंटरमिजिएटची एक १७ वर्षीय विद्यार्थिनी गत शनिवारी रात्री पबमध्ये वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. तेथून तिला घरी सोडण्याची बतावणी करून कारमधून नेताना पाच अल्पवयीन मुलांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित आरोपींमध्ये काही राजकारण्यांची मुलं असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हैदराबाद पोलीस कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून केला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी काल (शुक्रवारी) एका आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर आज सकाळी अन्य एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ओमेर खान असं अटक केलेल्या दुसऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे. शुक्रवारी पोलिसांनी सदुद्दीन मलिक या आरोपीला अटक केली होती. इतर तीन अल्पवयीन आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत शनिवारी २८ मे रोजी वाढदिवसाच्या पार्टीसाठी एका पबमध्ये गेली होती. पार्टी करत असताना पबमध्ये पीडितेची ओळख एका आरोपीसोबत झाली. त्याने पीडितेला घरी सोडण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर पाच आरोपींनी पीडितेला घरी सोडण्याची बतावणी करून कारमध्येच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हा गुन्हा एका आमदाराच्या लाल मर्सिडीज कारमध्ये झाल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र, हा गुन्हा अन्य एका इनोव्हा कारमध्ये घडल्याचं पोलिसांनी सांगितलं, याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी, शुक्रवारी पोलिसांनी या मुलीवर बलात्कार झाल्याच्या आरोपास दुजोरा दिला. वैद्यकीय तपासणीत तसे आढळून आले आहे. या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली असून त्यापैकी एकाच्या मालकीची कार जप्त करण्यात आली आहे. पीडितेच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे.
शुक्रवारी सायंकाळी भाजपा कार्यकर्त्यांनी आरोपींच्या अटकेसाठी ज्युबली हिल्स पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन केलं. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. संबंधित आरोपी टीआरएस आणि एमआयएम आमदाराच्या नात्यातील असल्याने पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही भाजपाकडून केला जात आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांनी सांगितलं की, “अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद सामूहिक बलात्काराचा मी तीव्र निषेध करतो. या घटनेत सत्ताधारी पक्षाच्या मित्रपक्षांचा समावेश असल्याची माहिती आहे. केसीआर दोषींवर कारवाई करण्यासाठी ओवेसींच्या परवानगीची वाट पाहत आहेत का,” असा सवालही बंदी यांनी विचारला आहे.
“ज्युबिली हिल्ससारख्या उच्चभ्रू भागातही महिला सुरक्षित नाहीत. आरोपींना ताबडतोब पकडता येत नसेल तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग काय? घटना घडली तेव्हाच पोलिसांनी तातडीनं कारवाई का केली नाही? विलंब कशामुळे झाला आणि ते कोणाचे संरक्षण करीत आहेत? पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याऐवजी आरोपींची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी,” असंही संजय बंदी म्हणाले.