हैदराबादमधील एका चार मजली इमारतीत आग लागल्यामुळे इमारतीतल्या नऊ रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नामपल्ली बाजार घाट परिसरातल्या इमारतीत ही दुर्घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही तासांनी ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं. तोवर इमारतीतल्या अनेक रहिवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच काही रहिवासी जखमी झाले होते.
या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, इमारतीच्या तळमजल्यावर केमिकल्स ठेवलेल्या पिंपांना आग लागली होती. तळमजल्यावर लागलेली ही आग वरच्या मजल्यांवर पसरली. लोकांचा खाली येण्याचा मार्ग बंद झाल्याने सर्वजण वरच्या मजल्यांवर अडकले. अग्निशमन दलाचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी आगीमुळे जखमी झालेल्या २१ रहिवाशांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
ही इमारत चार मजल्याची आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर कूलर्सची फायबर बॉडी बनवण्यासाठी वापरलं जाणारं केमिकल भरून काही पिंप ठेवले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की ही आग केमिकलमुळेच लागली आणि वरच्या मजल्यांवर पसरली. दरम्यान, . पोलीस उपायुक्त वेंकटेश्वरलू म्हणाले, इमारतीच्या तळमजल्यावर कार दुरुस्त करण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी शॉर्ट सर्किट होऊन काही ठिणग्या उडाल्या. ज्यामुळे बाजूला ठेवलेल्या पिंपांमधील केमिकलने पेट घेतला.
हे ही वाचा >> “चार हात असणारी लक्ष्मी जन्माला कशी येते?” दिवाळीच्या दिवशी सपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
उपायुक्त वेंकटेश्वरलू म्हणाले, सुरुवातीच्या तपासात अशी माहिती मिळाली आहे की, वरच्या मजल्यांवरील लोकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील सहा फ्लॅट्समध्ये सहा कुटुंबं राहत होती. तर चौथ्या मजल्यावर कोणीही राहत नव्हतं.