हैदराबादच्या नागरिकांनी सध्याच्या दु:खाच्या प्रसंगी शांतता कायम ठेवावी. येथे घडविण्यात आलेल्या हीन कृत्यानंतरही येथील जनतेने प्रक्षोभ टाळला, याचे मला समाधान वाटते, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रविवारी येथे सांगितले.
पंतप्रधानांनी येथे बॉंबस्फोट झालेल्या दिलसुखनगर भागातील ठिकाणांना रविवारी भेट दिली. ते येथे दहा मिनिटे होते. त्यांनी स्फोटातील जखमींची रुग्णालयात जाऊन सुमारे चाळीस मिनिटे विचारपूस केली.
‘‘मी येथील जनतेच्या दु:खात सहभागी होण्यासाठी आलो आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी असून, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी प्रार्थना करतो,’’ असे त्यांनी येथे भेटीनंतर बोलताना सांगितले.
जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. हवाई दलाच्या खास विमानाने पंतप्रधानांचे येथे आगमन झाले. त्यांनी स्फोटातील जखमींवर उपचार करण्यात येत असलेल्या  येथील ओमनी आणि यशोदा या रुग्णालयांना भेट देऊन जखमींच्या नातेवाईकांची विचारपूस केली. स्फोट झालेल्या दोन्ही ठिकाणांना त्यांनी भेट दिली.
या स्फोटांमध्ये गंभीर जखमी तसेच अपंग झालेल्यांना रोजगार देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची सूचना त्यांनी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांना केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तपासकामाचा आढावा घेतला. राज्याचे पोलीस महासंचालक व्ही. दिनेश रेड्डी यांनी त्यांना तपासाबाबत माहिती दिली. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रणातून काही दुवे हाती लागले असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली असल्याचे समजते. पंतप्रधान तीन तास शहरात होते.

Story img Loader