Physiotherapist Kills wife and Daughters : विवाहबाह्य संबंधातून हैदराबादमधील एका ३२ वर्षीय फिजिओथेरपिस्टने स्वतःच्या पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. तिघांचा खून केल्यानंतर सदर आरोपीने अपघाताचा बनाव रचला मात्र त्याचा हा बनाव पोलिसांनी उघड केला. खून केल्यानंतर जवळपास ४५ दिवस आरोपी आपल्या प्रेयसीसह सुखात राहत होता. मात्र अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीचे नाव बोडा प्रवीण असे असून त्याने त्याची पत्नी बोडा कुमारी (२९), मुलगी क्रिशिका (५) आणि क्रितीका (३) यांची हत्या केली होती.
प्रेयसी सोनी फ्रान्सिकच्या इच्छेखातर बोडा प्रवीणने आपल्याच सुखी संसाराला नख लावले. २८ मे रोजी अपघातात पत्नी आणि मुली मरण पावल्या असे त्याने सांगितले. तत्पूर्वी प्रवीणने पत्नीला भूल देणारे इंजेक्शन देऊन ठार केले. त्यानंतर स्वतःच्या दोन्ही मुलींना गाडीच्या पुढच्या सीटवर नाक आणि तोंड दाबून मारून टाकले आणि त्यानंतर गाडीची झाडाला धडक दिल्याचा बनाव केला.
हे ही वाचा >> Andhra rape-murder : आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याआधी त्यांनी मोबाइलवर पॉर्न पाहिलं; अल्पवयीन आरोपींची धक्कादायक कबुली
बोडा प्रवीणचे कुटुंब तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील होते. सुट्ट्यांसाठी हैदराबादहून खम्ममला जात असताना अपघात झाल्याचे त्याने सांगितले होते. अपघातानंतर त्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतला आणि त्यानंतर आपल्या प्रेयसीसह तो मजा करत होता, अशी माहिती रघुनाथपालम पोलीस ठाण्याचे प्रमुख कोंडल राव यांनी दिली.
कोडंल राव यांनी पुढे सांगितले की, बोडा कुमारी यांच्या शरीरावर आम्हाला इंजेक्शन दिल्याचे निशाण दिसले होते. तसेच अपघात होऊनही पत्नी आणि मुलींच्या शरीरावर जखमा झाल्या नव्हत्या. शवविच्छेदन केल्यानंतर तीनही मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिले होते. तसेच पोलिसांनी ज्याठिकाणी अपघात झाला, तिथेही भेट दिली. प्रवीणने सांगितले, त्याप्रमाणे अपघात फार गंभीर दिसत नव्हता. जेव्हा गाडीची तपासणी केली, तेव्हा गाडीत इंजेक्शन आणि औषधे मिळाली.
पोलिसांनी सदर इंजेक्शनची न्यायवैद्यक तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत प्रवीण आपल्या सामान्य आयुष्यात परतला होता. तो प्रेयसी सोनी फ्रान्सिसबरोबर एका भाड्याच्या घरात राहत होता. तसेच हैदराबादमधील रुग्णालयात त्याने कामावर जाणेही सुरू केले होते. प्रेयसी सोनी त्याच रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. कोंडल राव यांनी सांगितले की, आम्ही ४५ दिवस त्याला फोन केला नाही. त्यामुळे प्रवीण निर्धास्त होता. त्याचा गुन्हा पचला, असे त्याला वाटत होते. मात्र इंजेक्शनचा न्यायवैद्यक चाचणीचा अहवाल प्राप्त होताच आम्ही त्याला अटक केली.
हे ही वाचा >> Son Set Fire To Mother : मालमत्तेच्या वादातून मुलाने आईला पेटवलं; लायटरने जाळलं अन्…, पोलिसांसमोरच निर्दयी लेकाचं क्रूर कृत्य!
खम्मम जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रमनमूर्ती यांनी सांगितले की, प्रवीणच्या पत्नीला त्याच्या आणि सोनीच्या नात्याबद्दलची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोघांमध्येही कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर त्याने पत्नी आणि चिमुकल्या मुलींना ठार करण्याचा निर्णय घेतला.