हैदराबादमध्ये शाळकरी मुलांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. मुलांनी मर्सिडीज कारमध्ये हे कृत्य केलं. पीडित मुलगी एका पार्टीसाठी पबमध्ये गेली होती. यावेळी तिची भेट या आरोपी मुलांसोबत झाली होती. आरोपी विद्यार्थी असून अकरावी, बारावीत शिकत आहेत. यामध्ये आमदाराचा मुलगाही सहभागी असल्याचं बोललं जात आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.
सर्व पाच आरोपी अल्पवयीन असून राजकीयदृष्ट्या प्रभावशाली कुटुंबातील आहेत. यामध्ये आमदाराचा मुलगाही सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पोलिसांनी सामूहिक बलात्कारात त्याचा सहभाग नसावा अशी शक्यता वर्तवली आहे.
शनिवारी संध्याकाळी १७ वर्षीय मुलगी आपल्या मित्रासोबत पबमध्ये गेली होती. यावेळी तिचा मात्र तिथून लवकर निघाला होता. यानंतर तिची आरोपींमधील एका मुलासोबत ओळख झाली. घरी सोडतो असं सांगितल्याने तरुणी त्याच्यासोबत तेथून निघाली होती. यावेळी त्याचे मित्रही सोबत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार करण्याआधी आरोपी केकच्या दुकानात गेले होते. यानंतर ज्युबिली हिल्स येथे आरोपींनी कार थांबवली आणि आळीपाळीने मुलीवर बलात्कार केला. दरम्यान ज्या आमदाराच्या मुलाचं नाव समोर येत आहे त्याने या घटनेआधी भीतीपोटी गाडीतून खाली उतरत पळ काढला असा दावा आहे.
मुलीच्या वडिलांनी शरिरावरील जखमा पाहिल्यानंतर विचारपूस केली असता मुलीने काही मुलांनी पबमध्ये आपल्या हल्ला केल्याची खोटी माहिती दिली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पण नंतर मुलीने बलात्कार झाल्याचं सांगितलं असता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
“मुलीचे वडील आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पण त्यांना मुलीसोबत नेमकं काय घडलं आहे याची माहिती नव्हती. मुलगी काहाही सांगण्याच्या स्थितीत नव्हती. महिला अधिकाऱ्यांना पाठवलं असता तिने सगळा घटनाक्रम सांगितलं,” अशी माहिती पोलीस अधिकारी जोएल डेविस यांनी दिली आहे.
“मुलगी आरोपींची ओळख पटवू शकत नाही आहे. तिच्याकडे फक्त एक नाव आहे. आम्ही फु़टेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेत आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.