भारतीय जनता पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती केल्यानंतर पक्षाला लक्ष्य करण्याच्या हेतूने पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा वाद रंगविण्यात आल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ नेते य़शवंत सिन्हा यांनी सोमवारी मांडले.
जमशेदपूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना यशवंत सिन्हा म्हणाले, भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, याचा निर्णय अजून पक्षाने घेतलेला नाही. पंतप्रधानपदाचा उमेदवार कधी जाहीर करणार, हे देखील ठरलेले नाही. तरीही या मुद्द्यावरून पक्षाला लक्ष्य करण्यासाठी वाद रंगविण्यात येत आहे. कॉंग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, हे कोणीच विचारत नाही. कॉंग्रेसने अजून आपला उमेदवार घोषित केलेला नाही. हा उमेदवार राहुल गांधी असेल की, ए. के. ऍंटनी की, दिग्विजयसिंह हे ही अद्याप स्पष्ट नाही.
नरेंद्र मोदी हे देशातील सर्वांत लोकप्रिय नेते असल्याचे दिसून आल्यामुळेच त्यांच्याकडे प्रचारप्रमुखपदाची धुरा देण्यात आली. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज आणि अरूण जेटली यांची नावे या पदासाठी चर्चेत होती. तरीही पंतप्रधानपदाचा उमेदवार पक्षाने अद्याप जाहीर केलेला नाही.

Story img Loader