काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज राजस्थानच्या जयपूरमध्ये एका रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून हा देश देश हिंदूंचा होता, हिंदुत्ववाद्यांचा नाही, असे सुनावले आहे. जयपूरमध्ये ‘मेहंगाई हटाओ महा रॅली’ला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “देशाच्या राजकारणात आज दोन शब्दांची एकमेकांसोबत टक्कर आहे. एक शब्द हिंदू आणि दुसरा शब्द हिंदुत्व. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही,” असं ते म्हणाले.
“हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातील फरक हा आहे की हिंदू सत्याचा शोध घेतो, त्याला सत्याग्रह म्हणतात. तर, हिंदुत्ववादी सत्ता शोधतात आणि त्याला सत्ताग्रह म्हणतात,” असं राहुल गांधी म्हणाले. पुढे मोदी सरकारवर निशाणा साधत गांधी म्हणाले, “आज भारतातील एक टक्के लोकसंख्येच्या हातात ३३ टक्के संपत्ती आहे. केवळ १० टक्के लोकांच्या हातात ६५ टक्के पैसा आहे. आणि सर्वात गरीब ५० टक्के लोकांच्या हातात फक्त ६ टक्के पैसा आहे.”
रॅलीदरम्यान प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील भाजपा सरकारवर टीका केली आणि भाजपाने नागरिकांसाठी काय केले, असा सवाल केला. “’काँग्रेसने ७० वर्षांत काय केले, असे विचारणाऱ्यांना मला विचारायचे आहे की, ७० वर्षांची ही चर्चा सोडा. गेल्या सात वर्षांत तुम्ही काय केले? एम्स, जिथून तुमचे विमान उडते ते विमानतळ देखील काँग्रेसने बांधले. काँग्रेसने ७० वर्षात जे निर्माण केले ते भाजपा सरकार विकत आहे. हे सरकार फक्त उद्योगपतींसाठी काम करत आहे,” असा आरोप प्रियंका यांनी केला.